नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या जमीन मालमत्तेची (संपत्ती व्यवस्थापन) माहिती जी.आय.एस.,जी.पी.एस., सॅटेलाईट इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे अक्षांश-रेखांशासह डिजिटल स्वरूपात संग्रहित केल्याने महानिर्मिती-महाजेम्सच्या आगामी प्रकल्प नियोजन आणि विकासात अश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान ठरणार असल्याचे महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल यांनी सांगितले. ते महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग नागपूर कार्यालयात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
याप्रसंगी मंचावर महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर तसेच महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. सुब्रतो दास प्रामुख्याने उपस्थित होते. राज्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर ह्या स्वायत्त संस्थेसोबत महानिर्मिती व महाजेम्सने नोव्हेंबर २०१७ मध्ये ह्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
पथदर्शी प्रकल्प म्हणून कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र व परिसराचे काम अत्यंत परिश्रम घेऊन काळजीपूर्वकरीत्या सात महिन्यात पूर्ण करण्यात आले. ज्यामध्ये वारेगाव, खसाळा, नांदगाव राख बंधारा, प्रस्तावित वारेगाव-कोराडी-खसाळा राख आधारीत उद्योग समूह, प्रकाशनगर व विद्युत विहार वसाहत, कोराडी पॉँड ३, कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्र व परीसिमेचा यामध्ये समावेश आहे.
कार्यशाळेत कोराडीचे मुख्य अभियंता अभय हरणे म्हणाले कि, अश्या पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आगामी काळात जमीन,संपत्तीविषयक प्रश्न सहज सुटतील, व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल, गतिमानतेने वाटचाल करणे सुकर होईल तर राजकुमार तासकर यांनी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंगच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग नागपूर केंद्र प्रमुख डॉ. सुब्रतो दास म्हणाले कि, आगामी काळात नियोजनाकरिता हा डिजिटल डाटा महानिर्मिती-महाजेम्सला निश्चितच सहाय्यकारी ठरेल.
महानिर्मिती व महाजेम्सच्या वैविध्यपूर्ण विकास प्रकल्पांच्या नियोजनाकरिता जसे वीज प्रकल्प, राखेवर आधारित उद्योग समूह, सौर ऊर्जा प्रकल्प, खाणकाम प्रकल्प इत्यादींसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) व अनुषंगिक कागदपत्रे तयार करताना प्रकल्पाची संभाव्य जागा, जागेचा वापर, जागेचे आच्छादन,प्रकल्पासाठी आवश्यक निरनिराळे स्त्रोत,लगतची साधन सामग्रीविषयक माहिती तातडीने मिळणे आवश्यक असते. परंपरागत पद्धतीमुळे या कामाला भरपूर वेळ लागत होता. मात्र आता, प्रकल्प व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात हि प्रणाली/तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.प्रारंभी प्रास्ताविकातून अमित मूर्तडक यांनी कार्यशाळा आयोजनामागची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्र संचालन तथा प्रभावी संगणकीय सादरीकरण महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राचे सहयोगी शास्त्रज्ञ डॉ. विवेक काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहयोगी शास्त्रज्ञ डॉ. अजय देशपांडे यांनी मानले.
याप्रसंगी महाजेम्सचे उप मुख्य अभियंता सुखदेव सोनकुसरे, महानिर्मितीचे अधीक्षक अभियंते परमानंद रंगारी, शैलेन्द्र गारजलवार, महानिर्मिती-महाजेम्सचे मुंबई तसेच कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, अभियंते, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित होते.