राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालया द्वारे ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रचार प्रसाराच्या या नव्या मोहिमेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकरी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपा आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत लाभार्थ्यापर्यंत दुहेरी संवादातून शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यास समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याच्या हेतूने युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी युवा माहिती दूत हे मोबाईल अप्लीकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन युवा माहिती दूत व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या किंवा निवडण्यात आलेले विद्यार्थी सहा महिन्याच्या कालावधीसाठी राज्य शासनाचे युवा माहिती दूत असतील. या कालावधीत किमान 50 प्रस्तावित लाभार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी लागू असणाऱ्या योजनांची माहिती देतील. युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्य शासनाकरीता काम करण्याचे महत्वाची संधी लोकांना मिळेल. युवा माहिती दूत अशी ओळख राज्य शासनाच्यावतीने त्यांना सहा महिन्याकरीता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम दिल्यानंतर या युवा माहिती दूतांना शासनाचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल ॲप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.