चिमूर येथील स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी बलिदान केले त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला मी आलो आहे. मात्र आज माजी प्रधानमंत्री, देशाचे लाडके नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे .त्यांच्या दीर्घायू आरोग्याची आपण सर्व प्रार्थना करूयात .आपणा सर्वांच्या प्रार्थना घेऊन मी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात आहे ,असे भावपूर्ण आवाहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील शहीद क्रांतीदिन कार्यक्रमाला जमलेल्या हजारो जनसागराला साद घातली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिमूर येथे क्रांती दिनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकास त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले .त्यानंतर त्यांनी किल्ला परिसरातील शहिदांच्या स्मृती भवनाला भेट दिली. याठिकाणी उभारण्यात आलेल्या नागाच्या प्रतिकृतीतील शहीद स्मारकाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे वित्त नियोजन वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा उपस्थित होते.
या दोन्ही ठिकाणी शहिदांना नमन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चिमूर येथील बीपीएड कॉलेज येथे आयोजित सभास्थळी भेट दिली. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमूर येथे येतील अथवा नाही याबाबत सकाळपासून जनतेमध्ये संभ्रम होता. तथापि ,चिमूर येथे दरवर्षी शहिदांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री येत असल्यामुळे बीपीएड कॉलेज मैदानावर हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते.याशिवाय अनेक कार्यक्रमाचे भूमीपूजन व लोकार्पण आयोजित केले होते .आज ते सर्व कार्यक्रम स्थागित करण्यात आले.
सभास्थळी आल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व औपचारिकता बाजूला ठेवत थेट जनतेशी संवाद साधला .देशाचे लाडके नेते माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे देशभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत .तथापि, आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमले असल्यामुळे आणि शहिदांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळे एकत्रित आलो असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री आपल्याशी आपल्या भावना व्यक्त करतील असे सांगितले .त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी काही मिनिटे जनतेशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांच्या मुळे आज स्वातंत्र्य आपल्याला अनुभवता येत आहेत. त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. चिमूरच्या स्वातंत्र्य लढ्यामुळेच नंतरच्या स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान केले. त्या सर्व शहिदांना मी अभिवादन करतो. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ठीक नाही .त्यामुळे आज या व्यासपीठावरून आयोजित केलेले अनेक उद्घाटनाचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण स्थगित केले आहे. श्रध्देय वाजपेयी यांच्या नेतृत्वात आम्ही कारगिल युद्ध जिंकले, पोखरण अनुस्फोट करून जगाला भारताची नवी ओळख करून दिली. त्यांच्या कारकिर्दीत सामान्य माणसाच्या जीवनात बदल करणारे हजारो निर्णय झाले. अटलजी आज अत्यवस्थ आहेत.त्यामुळे आज या शहिदांच्या भूमीतून जमलेल्या हजारो देशभक्त नागरिकांच्या प्रार्थना घेऊन मी त्यांच्याकडे जात आहे .त्यांच्या दीर्घायू आरोग्याची प्रार्थना घेऊन मी दिल्लीला रवाना होत असल्याचे त्यांनी या व्यासपीठावरून सांगितले. यावेळी हजारोच्या संख्येने याठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
त्यानंतर लगेच चिमूर क्रांती लढ्यातील शहिदांना मौन बाळगून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम ,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, महापौर अंजलीताई घोटेकर आणि या कार्यक्रमाचे आयोजक कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया ,माजी मंत्री शोभाताई फडणवीस ,संजय देवतळे आदी उपस्थित होते.