वर्ध्या जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. बरेचदा जनावरांना साथीच्या आजारांची लागण होते. तेव्हा ते जनावरांना उपचारासाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेतात. मात्र येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांना गावकर्यांनी जनावरांच्या आजाराविषयी माहिती दिल्यावरही याकडे गांभीर्याने घेतले जात नाही,असाच प्रकार गिरड येथून जवळच असलेल्या तावी येथे घडला आहे, माहिती देऊनही पशुधन अधिकारी जनावराच्या तपासणीसाठी येत नसल्याचा आरोप तावी गावच्या नागरिकांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून तावी गावात जनावरांना विविध आजाराची लागण झाली असल्याने पशुपालक वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे.मंगरूळ येथील पशुधन अधिकारी यांच्याकडे तावी गावचा कार्यभार आहे,तावी अन मंगरूळचे अंतर तब्ब्ल ३२ किमी आहे.
येथील पशुधन अधिकाऱ्यांना वारंवार नागरिकांनी दूरध्वनीवरून गावात जनावरांना साथीचा रोगाची लागण झाल्याचे सांगितले.मात्र या अधिकाऱ्याने एकदा फिरती गावाला भेट दिली आणि थातूर मातुर पद्धतीने जनावरांचा उपचार केला.यानंतर पशुधन अधिकारी या गावात फिरकले नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.या गावात शेकडो जनावरे तोंड खुरी आणि अन्य आजाराने ग्रासले आहे. पशु वैध्यकीय विभागाने दुर्लक्ष केल्याने हि लागण वाढत जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.