चंद्रपुर/प्रतिनिधी:
कारंजा येथील अनेक वर्षांपासून समाजसेवेचे ब्रीद घेतलेल्या साई मित्र परिवार गृप तर्फे केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने विस्कळीत झालेल्या जनजीवनाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी समाजसेवी युवकांद्वारे माणुसकीचा आधार देत मदतनिधी संकलनाचे कार्य दि.२४/०८/२०१८ ते दि. २७/०८/२०१८ राबविण्यात आले. या काळात युवकांनी कारंजा परिसरातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांना तसेच गावातील नागरिकांना भेटी देऊन केरळ येथील परिस्थिती समजावून सांगून पूरग्रस्त लोकांच्या मदतीकरिता शक्य तेवढा निधी देण्याची विनंती केली व तेवढाच प्रतिसाद लोकांनी दिल्याने एकूण १४,९५०/-(अक्षरी रुपये चौदा हजार नऊशे पन्नास फक्त) एवढा निधी जमा झाला.
हा निधी जरी तुलनेत कमी जरी वाटत असला तरी माणुसकीचा विचार करता पैशापेक्षाही मनाची मदत व लोकांच्या मनात आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी असलेली कळवळ या निमित्ताने दिसून आली.
हा निधी सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील थेट केरळ राज्यात टीम राहत मिशनद्वारे कार्यरत असलेल्या एकूण ५० आजी-माजी विद्यार्थी ज्यात आपल्या महाराष्ट्रातील ३५ युवक व १५ युवतींचा समावेश आहे त्यांना हा निधी पाठविण्यात आला.
हे युवक सध्या तेथे सक्रिय कार्यरत असल्याने त्यांच्या मदतकार्याला अजून पाठबळ मिळण्यासाठी हा निधी थेट केरळ राज्यात पाठविण्यात आला.