१४ जून २०१५ रोजी चंद्रपूरसह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणाचा तब्बल ३ वर्ष नंतर निकाल लागला. चीचपल्ली मार्गावरील घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती प्रदीप के. भेंडे यांनी सोमवारी हा निकाल दिला.
कुणाल मनोहर गेडाम (२२), शुभम् बापूजी घोडाम (२१), संदीप तलांडे (२१, तिघेही रा. घंटाचौकी) व अशोक कन्नाके (२५ रा. दुर्गापूर वॉर्ड क्र. १) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
‘फॉरेस्ट गार्ड’ असल्याची बतावणी करून त्या दोघांना येथे बसण्यासाठी १० हजारांची मागणी केली. नंतर तिघांनी कुणालला तिथे वन अधिकारी असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्या चौघांनी पैसे नसल्याचे पाहून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने स्पष्ट नकार दिल्या नंतर प्रियकराचा मोबाइल हिसकावून घेऊन तरुणीवर बलात्कार केला.या प्रकरणी पीडित तरुणीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
न्यायालयाने कलम ३९४ अन्वये पाच वर्षे शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने शिक्षा, कलम ३७६ अन्वये २० वर्षे शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा निर्णय दिला.