पोलीओ नंतर मिजल्स व रुबेला
आजाराला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न
चंद्रपूर, दि.24 ऑगस्ट –
‘ पोलीओ इज गॉन, मिजल्स अँड रुबेला इज नेक्स्ट ’ अशा खंबीर धोरणासह चंद्रपूर जिल्हा प्रशासन मिजल्स व रुबेला
आजारांना जिल्हयातून हद्दपार करण्यासाठी सज्ज होत आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल
खेमनार यांच्या नेतृत्वात नोव्हेंबरमध्ये या लसीकरणाला शंभर टक्के यशस्वी करण्याचे
जिल्हयातील आरोग्य यंत्रणेने ठरवले असून या संदर्भातील प्राथमिक बैठकीमध्ये
जिल्हयातील सर्व विभागाने आपले दायित्व पूर्ण करण्याचा संकल्प आज केला आहे.
. जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीला
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.राठोड, महानगरपालिकेच्या वैद्यकीय
आरोग्य अधिकारी डॉ.अंजली आंबटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण
अधिकारी डॉ.संदिप गेडाम, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष शैलेश बागला यांच्यासह विविध
विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
कार्यालयामध्ये आज झालेल्या बैठकीत डॉ.कुणाल खेमनार यांनी महाराष्ट्र शासन संपूर्ण
जिल्हयामध्ये मिजल्स व रुबेला (एमआर)
लसीकरण मोहीम राबवित असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीमध्ये
जिल्हयातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला एमआर लसीकरण
मोहीमेत
सहभागी करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय
व
खाजगी शाळांचा 100 टक्के सहभाग अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हाभरात
वेगवेगळया पातळीवर अनेक कार्यशाळांचे
आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये लसीकरण करण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे,
शाळा,
अंगणवाडी, मदरसा व शाळाबाहय बालकांचा शंभर टक्के सहभाग नोंदवणे.
लसीकरणासाठी सामाजिक जागृती करणे. या सर्व आघाडयांवर सहभागी असणा-या
विभागांना मोहिमेची माहिती व कामाचे
लक्ष निश्चित करण्यात आले.
देशात
अनेक राज्यांनी ही मोहिम शंभर टक्के फत्ते केली आहे. महाराष्ट्रात राज्य शासन
एकत्रितपणे नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात ही मोहिम राबविणार असून त्याबाबतच्या
नेमक्या तारखा लवकरच जाहिर केल्या जाणार आहे. जिल्हयातील सर्व समाजसेवी व सामाजिक
संघटनांची मदत या कार्यात लागणार आहे. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होवून सुदृढ
समाजनिर्मितीमध्ये प्रत्येकाने हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
मिजल्स-रुबेला काय आहे ?
मिजल्स म्हणजे. गोवर. रुबेला हा गोवरसारखाच सौम्य आजार आहे. परंतू
हा आजार गरोदर मातेला झाला तर तीच्या होणा-या बाळाला जन्मजात आजार होवू शकतो.
शरिरामध्ये जन्मजात विकार जसे मतीमंदता, आंधळेपणा, बहिरेपणा, हृदयाचे विकार होवू
शकते. गरोदर मातेचा गर्भपात देखील होवू शकतो.
जगभरात हा आजार ज्यांना लागू झाला आहे. त्यामध्ये भारताची टक्केवारी 36
टक्के आहे. विकसीत देशांमधून हा आजार हद्दपार झाला असून पोलीओप्रमाणेच योग्य
पध्दतीने लसीकरण राबविल्या गेल्यास भारतातून देखील हा आजार शंभर टक्के हद्दपार
होण्याची अपेक्षा आहे. यासाठी देशभरात
मोहीम राबविण्यात येत असून काही राज्यामध्ये ही मोहिम पूर्ण झाली आहे. प्रत्येक
नागरिकांनी आपल्या 15 वर्षापर्यंतच्या पाल्याला रुबेलाचे इंजेक्शन देणे आवश्यक
आहे. अनेकांनी ते घेतले असले तरी या मोहिमेमध्ये संपूर्ण बालकांना सहभागी केले
जाणार आहे.
|