সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 06, 2017

तू हसलीस म्हणजे " चारोळीसंग्रहाचे प्रकाशन व कवीसंमेलन

मनाच्या अधोराज्यावर आधारलेले साहित्य दुरगामी परिणामकारक ठरते

विजया मारोतकर यांचे प्रतिपादन - सुरेश डांगे यांचा चारोळीसंग्रह

चिमूर /प्रतिनिधी - साहित्य हे मनातून यावं लागतं.मनातील सा-या आशा,आकांक्षा, वेदना या काव्यातून व्यक्त होत असतात.साहित्य हे विविधांगी फुलो-याने फुलत असतं.ते सर्वत्र मनसोक्त विहार करतं. सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून हसण्याच्या विविध पैलूंना उजागर केले आहे.हसण्याने निसर्ग,नदी- नाले,वृक्षवेली,चंद्र,सूर्य,तारे या सर्वांवर होणारा परिणाम अभिव्यक्त केला आहे.निसर्गावरच नाही तर समाजमनावर,आयुष्यावर आणि शेअर मार्केटवरही हसण्याने परिणाम होतो, हे सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून विषद केला आहे. तू हसलीस म्हणजे हा हास्योत्सवच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आचार्य विजया मारोतकर यांनी केले.



त्या चिमूर येथील अनुसूचीत जाती मुलींची निवासी शाळेच्या सभागृहात शिक्षक साहित्य संघ व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण आयोजित सुरेश डांगे यांच्या " तू हसलीस म्हणजे " चारोळीसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या.प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र झाडे होते.विशेष अतिथी म्हणून कवयित्री डॉ.विना राऊत,भाष्यकार चित्रा कहाते,कवयित्री तथा मोहपाच्या नगराध्यक्षा शोभा कऊटकर,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,नरेंद्र बोबडे, दुशिला मेश्राम,किशोर वरभे,संध्या बोकारे आदी उपस्थित होते.

शिक्षक आज प्रचंड अस्वस्थेत असताना सुरेश डांगे यांनी चारोळीसंग्रहातून हसण्याचे रहस्यभेद उलगडवून दाखविले.त्यांच्या काव्यातून तिच्या हसण्याने होणारी घालमेल व्यक्त होते.ती कोण असावी हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.तू हसलीस म्हणजे हे एकच वाक्य घेऊन एक चारोळीसंग्रह निर्माण करणारे हे तर जिकिरीचेच काम आहे आणि ते सुरेश डांगे यांनी पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र झाडे यांनी केले.चारोळीसंग्रहावर भाष्य कवयित्री चित्रा कहाते यांनी केले.त्यांनी पुस्तकाचे अंतरंग व बाह्यांग रसिकांना उलगडवून देताना तिच्या हसण्याचे किती सुंदर,मनोवेधक,आल्हाददायक परिणाम आहेत हे स्पष्ट केले.या परिणामांसोबतच काही नकारार्थी परिणामही किंबहुना होणारा अतिरेकी परिणाम कवींनी आपल्या काव्यातून मांडला असल्याचे चित्रा कहाते यांनी चारोळीसंग्रहावर भाष्य करताना स्पष्ट केले.
शिक्षकी पेशा सांभाळत सामाजिक,शैक्षणिक,साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या सभासदांचा शिक्षक साहित्य संघातर्फे शाल,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्तींमध्ये राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक नरेंद्र बोबडे,जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक रविंद्र उरकुडे,प्रकाश कोडापे,नंदा खानोरकर,नागपूर विद्यापीठाची पी.एच.डी.प्राप्त डॉ.अश्विनी रोकडे,अनु.जाती मुलींची निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका दुशिला मेश्राम,कवी व चित्रकार बंसी कोठेवार,पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे राजकुमार चुनारकर यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक साहित्य संघाच्या अध्यक्षा संध्या बोकारे यांनी केले.संचालन डॉ.अश्विनी रोकडे यांनी केले.आभार वंदना हटवार यांनी मानले.
प्रकाशन समारंभानंतर कवीसंमेलन घेण्यात आले.कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान कवयित्री डॉ.विना राऊत यांनी भूषविले.विशेष अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,कवी धनंजय साळवे उपस्थित होते.चंद्रपूर,नागपूर,वर्धा या जिल्ह्यांमधून ४६ कवींनी आपल्या कवितांची मेजवानी चिमूरच्या रसिकांना उपलब्ध करुन दिली.अनुसूचीत जाती मुलींची निवासी शाळेतील १५ बालकवयित्रींनी आपल्या कविता सादर करुन आपल्या प्रतिभेची चुणूक उपस्थितांना करुन दिली.कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.अश्विनी रोकडे यांनी केले.कवीसंमेलनाच्या उद्घाटनाचे संचालन रजनी गेडाम यांनी केले तर आभारप्रदर्शन अभिलाष गोमासे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावन शेरकुरे,जीवन राठोड,प्रकाश कोडापे,कवडू लोहकरे,रॉबिन करमरकर,कुशाब रोकडे,मनिषा धंदरे,पौर्णिमा लोध,सविता झाडे,लीना भुसारी आदींनी परिश्रम घेतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.