সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, August 02, 2018

नागपुरात गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी

मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांची माहिती 

ई-मेल, एसएमएस, पत्राद्वारे दिली जाणार परवानगीची माहिती 

गणेश मंडळ परवानगी साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
गणेशोत्सवात गणेश मंडळांना परवानगीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बराच वेळ निघून जातो. यंदाचा गणेशोत्सव या समस्येपासून सूटका करणारा ठरणार आहे. यंदा परवानगीसाठी तात्काळ प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागरिकांना विना विलंब परवानगी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, परवानगीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ई-मेल, एसएमएस अथवा पत्राद्वारे नागरिकांना त्याबाबत माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिली. 
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात गुरुवारी (ता. २) आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, अपर आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता (लोककर्म) एम.एच. तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता राजेश रहाटे, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर, विकास अभियंता सतीश नेरळ, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) अशोक बागुल, अजनी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन दुर्गे, एसएनडीएलचे व्यवस्थापक सचिन पाटील, सहव्यवस्थापक अशोक गुप्ता, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसरे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. 
गणेशमंडळांच्या परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून २४ तासात मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पेमेंट सुविधा करण्यात येणार आहे. यंदा एकाचवेळी परवानगीसाठी शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी याकडे लक्ष द्या, असे निर्देश यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. याशिवाय गणेशोत्सव विसर्जनस्थळी कृत्रिम तलावांसह निर्माल्य संकलन, स्वच्छता व सुरक्षेच्यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात यावी व त्यादृष्टीने संपूर्ण तयारी सुरू करा. गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांवर आवश्यक त्या सुविधा उभारण्यात याव्यात. शिवाय गणेशोत्सवादरम्यान नियमित स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. शहरातील सक्करदरा, सोनेगाव व गांधीसागर तलावात मागील वर्षी मूर्ती विसर्जित करण्यात आल्या नव्हत्या. त्या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यंदाही असे कृत्रिम तलाव निर्माण करण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये एक फिरते कृत्रिम तलाव पथक तैनात करून घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात यावे. फिरते कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात यावेत. नागरिकांमध्ये कृत्रिम तलावाबाबत जागृती व्हावी यासाठी विसर्जनस्थळी मोठ्या फलकांद्वारे संदेश देण्यात यावे. शिवाय प्रत्येक झोनमध्ये दहा ते बारा महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी फलकांद्वारे जनजागृती करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. 
शहरातील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन फुटाळा तलावात केले जाते. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जावी. नागरिकांना स्वत: पाण्यात उतरू न देता मनपाचे कर्मचारी येथे तैनात करण्यात यावे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी फुटाळ्यासह नाईक तलाव परिसरातही क्रेन, बॅरिकेट्‌सची व्यवस्था करण्यात यावी. विसर्जनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरही दररोज स्वच्छता राहिल, याचीही दक्षता घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
गणेशोत्सव पंडालच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये, यासाठी समिती गठीत करुन मंडळांची चौकशी करण्यात येणार आहे. पीओपीच्या मूर्ती संदर्भात विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची पाहणी करण्याचीही जबाबदारी समितीकडे असून नियम भंग करण्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश आयुक्त श्री. सिंह यांनी दिले. गणेशोत्सवादरम्यान मनपा व पोलिस प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनस्थळी दिवसभर तैनात असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रत्येकाला जेवणाचे पॅकेट देण्यात यावे. यासाठी विसर्जनस्थळी स्टॉल्स उभारण्यात यावेत. याशिवाय वेगवेगळ्या विसर्जनस्थळावर कार्यरत सामाजिक संस्थांसोबत चर्चेसाठी लवकरच बैठक बोलाविण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.