राज्यातील सात जिल्ह्यांच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि तिथे असलेल्या आणि निर्माण करता येऊ शकतील अशा रोजगार संधींचा शोध घेण्यासाठी केपीएमजी आणि पीडब्ल्युसी या दोन कंपन्यांना नियुक्त करण्यात आले होते त्यांनी काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादरीकरण केले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.निवडण्यात आलेल्या सात जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत या सात जिल्ह्यात गुंतवणूक वाढवतांना येथे व्यापक रोजगार संधी निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करतांना ते पर्यावरणस्नेही, भौगोलिक गरजांची पुर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणारे रोजगार असावेत, त्यादृष्टीनेही या सर्वेक्षणात अभ्यास केला जावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.या दोन संस्थांनी सादर केलेल्या सर्वेक्षणानंतर उत्तम रोजगार जे प्रत्यक्षात कार्यान्वीत होऊन स्थानिकांना अधिक लाभदायक, रोजगारक्षम ठरू शकतील अशा उद्योग- व्यवसायाच्या स्थापनेसाठी दिशादर्शक नियोजन करून ते प्रत्यक्षात अंमलात आणले जाणार आहे.
या दोन संस्थांनी सात जिल्ह्यातील नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती, सध्या तिथे असलेले रोजगार, त्यांचे स्वरूप आणि भविष्यातील विकासाच्या वाटा, त्यातून निर्माण होणारे रोजगार याचा अभ्यास केला आहे. या सात शहरात कृषी, पणन, वन, कृषीप्रक्रिया केंद्र, पशुसंवर्धन- दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वनोपज, माहिती तंत्रज्ञान, निसर्ग पर्यटन यासह इतर सर्व संबंधित क्षेत्रातील रोजगारांचे सादरीकरण झाले. स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनांचा गुणात्मक विकास, पणन व्यवस्थेची साखळी विकसित करणे, उत्पादन प्रक्रिया राबवितांना त्यात स्वच्छता आणि गतिमानता आणणे, या रोजगार संधीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयातून योजनांच्या अंमलबजावणीला गती देणे, यादृष्टीकोनातून करावयाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांवरही आजच्या सादीकरणादरम्यान चर्चा झाली.