সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 03, 2018

कला संगम प्रस्तुत “इम्मॉरटल रफी” कार्यक्रमाचे दर्जेदार सादरीकरण

नागपूर/प्रतिनिधी:
मोहम्मद रफी संगीत क्षेत्रातील एक लाडकं व्यक्तिमत्व. त्यांच्या मखमली आवाजापुढे, सुमधूर गायकीपुढे रसिकमन नतमस्तक होतं. आजही इतक्या वर्षांनी त्यांची गाणी जुन्या पिढीलाच नव्हे तर तरूण पिढीलाही वेड लावतात. अश्या महान गायकाच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून नागपुरातील कलासंगम प्रतिष्ठान ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर करत असते. कलासंगम प्रतिष्ठान आयोजित आणि स्वरधारा प्रस्तुत हा कार्यक्रम नुकताच लक्ष्मीनगर सायंटिफिक सभागृहात पार पडला.
नागपूरातील सुप्रसिद्ध गायक जोडी योगेंद्र आणि ईशा रानडे यांनी त्यांच्या वाद्यवृंदासह हा कार्यक्रम सादर केला. या गायकद्वयांची लहानगी लेक “अवनी” या कार्यकमाचं मुख्य आकर्षण होती. तिने तिच्या बाबाबरोबर गायलेलं " नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है" हे गाणं रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हे गाणं गातानाचा तिचा आत्मविश्वास, तिचं पाठांतर वाखाणण्याजोगं होतं. तिच्या पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा!
" तुमने पुकारा और हम चले आये" या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या मधुर आवाजात योगेंद्रने "गर तुम भुला ना दो गे....जो बात तुझमे है तेरी तसवीर मे नही.. लिखे जो खत तुझे ..आज पुरानी राहोसे....मै तो तेरे हसीन खयालो मे खो गया ही आणि अशीच सोलो गाणी लीलया सादर केली. ईशाच्या सुरेल साथीनं गायलेली द्वंद्वगीतही एकाहून एक अशी सरस होती. "साज ए दिल छेड दे... देख हमे आवाज न देना ओ बेदर्द जमाने... आवाज देके हमे तुम बुलाओ... 
ही संथ गाणी तर के जान चली जाये..नि सुलताना रे..आया सावन झुमके... ओ हसीना जुल्फोवाली... ही दमदार गाणी दोघे तितक्याच ताकदीने गायले. योगेंद्रच्या "जंगल मे मोर नाचा" आणि ईशा-योगेंद्रच्या "जबाने यार मन तुर्की तुर्की या गाण्यानी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. जवळ-जवळ सगळ्याच गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्तपुणे वन्समोअर दिला हे विशेष. 
कार्यक्रमाची आणखी एक खासियत म्हणजे रफी साहेबांच्या शीर्षकगीतांचा मिडले. यात प्रामुख्याने " फिर वही दिल लाया हू.. राजकुमार.. चाहे कोई मुझे जंगली कहे.. दिल तेरा दिवाना..." या गाण्यांचा समावेश होता. ही गाणी गातानाचा योगेंद्रचा उत्साह विलक्षण होता. डॉ. सुहास देशपांडे यांनी या अप्रतिम गाण्यांची निवड केली. 
श्वेता शेलगावकर यांनी कार्यक्रमाचं उत्तम निवेदन केलं. मो.रफी मधल्या गायकाची आणि माणसाची एक एक छटा उलगडताना त्यांच्यातला अभ्यासू निवेदक दिसला, तर नेहमीप्रमाणे कविता,शेर,शायरींची श्रोत्यांवर उधळण करताना त्यांच्यातल्या रसिकाची ओळख झाली. वादनाची धुरा पवन मानवटकर महेंद्र ढोले, प्रकाश खंडाळे, प्रकाश चव्हाण, अरविंद उपाध्ये, अमर शेंडे, अशोक टोकलवार, सुभाष वानखेडे, दिपक कांबळे व सौ. उज्वला गोकर्ण यांनी सांभाळली. सेन्ट्रल बँक व समृद्धी को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या सहकार्यातून या दर्जेदार तथा सर्वांगसुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला. अप्रतिम सादरीकारणाबद्दल गायक-वादक कलावंतांचे आभार मानावे तितके कमीच.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.