सुमारे १७ वर्षांपूर्वीच्या चारा घोटाळाप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री व राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने आज पाच वर्षांचा कारावास आणि २५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा व जदयु खासदार जगदीश शर्मा यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांना अनुक्रमे दोन व पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या नेत्यांच्या समर्थकांची मोठी संख्या लक्षात घेता न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी दोषींना ही शिक्षा सुनावली.