সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, October 13, 2013

लाखो निळी पाखरे दीक्षाभूमीवर



नागपूर- देश-विदेशातील लाखो निळी पाखरे दीक्षाभूमीवर विसावली आहेत , येथील माती मस्तकाला लावण्यासाठी ,नवी ऊर्जा घेण्यासाठी... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्त्वापुढे नतमस्तक होण्यासाठी. याच पाखरांच्या साक्षीने आज रविवारी दीक्षाभूमीवर सायंकाळी ६ वाजता ५७ वा धम्मचक्रप्रवर्तनदिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य सोहळा होईल. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सु. गवई असतील.

 पावसाचे दिवस असल्याने मान्यवरांसाठी व्यासपीठावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय दीक्षाभूमीकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष असे की, बजाजनगराकडून व्यासपीठाकडे जाणारा रस्ता गुळगुळीत करण्यात आला असून या रस्त्यावर स्मारक समितीतर्फे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

पोस्टर स्पर्धा

दीक्षाभूमीच्या चहूबाजूंनी मोठमोठे फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काछीपुरा रोडवर नगरसेवक प्रकाश गजभिये यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे असलेले प्रवेशद्वार लावले आहे. याशिवाय सलील देशमुख, मनसे, बसपाचे मोठमोठे होर्डिंग्ज लावलेले आहेत. लक्ष्मीनगराकडून येणार्‍या रस्त्यांवर पीरिपाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व त्यांचा मुलगा जयदीप कवाडे यांची छायाचित्रे असलेले प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधत आहेत. शासकीय चित्रकला महाविद्यालयासमोर माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी भव्य होर्डिंग्ज लावले असून भाविकांना याचे आकर्षण वाटत आहे.

भिक्खू संघास तीन दिवस भोजनदान

बौद्ध धम्मात भिक्खूंना भिक्षा मागूनच अन्न ग्रहण करावे लागते. बुद्धविहारात वास्तव्यास राहून धम्मप्रचार व प्रसार करणे भिक्खूंकडून अपेक्षित असते. देशभरातून दीक्षाभूमीवर भिक्खू दाखल झाले आहेत. त्यांंच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी भिक्खूणी रूपानंदा यांनी पुढाकार घेतला आहे. पंचशील महिला मंडळातर्फे भिक्खूंसाठी तीन दिवसीय भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष असे की, भिक्खू हे दुपारी १२ वाजेपूर्वी अन्नग्रहण करीत असतात. त्यानंतर सायंकाळचे भोजन त्यांच्यासाठी वर्ज्य असते.

बोधिवृक्षाखाली सूत्तपठन

दीक्षाभूमीवर असलेल्या बोधिवृक्षाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गौतम बुद्धांनी ज्या बोधिवृक्षाखाली बोधिसत्त्व प्राप्त केले त्या वृक्षाचे रोपटे नेपाळहून येथे आणण्यात आले आहे. या रोपट्याचे आता बोधिवृक्षात रूपांतर झाले असून याच ऐतिहासिक बोधिवृक्षाखाली भिक्खू संघाचे सूत्तपठन सुरू होते. यात देशविदेशातून आलेले शेकडो भिक्खू सहभागी झाले होते. विशेष असे की, याठिकाणी भिक्खू बनणार्‍यांसाठी रीतशीर दीक्षा दिली जात होती. तसेच त्यांना चिवरदान केले जात होते.

धम्मदीक्षा सोहळा

भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात देशभरातून आलेल्या भाविकांना बुद्ध धम्माची दीक्षा देण्यात येत होती. हा सोहळा १० ऑक्टोबरपासून दीक्षाभूमीवर सुरू आहे.

पादत्राणांसाठी प्लास्टिक पिशव्यांचे वाटप
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक बौद्ध बांधवांनी आदल्या दिवशीच बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यामुळे शनिवारी सायंकाळी दीक्षाभूमीवर एकच गर्दी झाली होती. स्तुपाच्या आत प्रवेश करणार्‍या प्रत्येक भाविकांना प्लास्टिक पिशवी पादत्राणासाठी दिली जात होती. बाहेर पडताना ती पिशवी परत घेतली जात होती.

चहूबाजूंनी वाहनांसाठी प्रवेशबंदी

दीक्षाभूमीकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली होती. प्रत्येक रस्त्यांवर पोलिस तैनात करण्यात आले होते. रविवारी होणार्‍या सोहळ्याला दोन केंद्रीय मंत्री व स्वत: मुख्यमंत्री हजर राहणार असल्याने सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे. तसेच सर्वच रस्त्यांवर पोलिस चौकी स्थापन केली होती.

पुस्तकांची दुकाने सजली


दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्धांचे वैचारिक ग्रंथ आणि मूर्तींनी दुकाने सजली आहेत. या दरम्यान पुस्तके आणि मूर्तींची भरपूर विक्री होत असते. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या गाण्यांच्या कॅसेट, सीडी, लॉकेट साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

नळांवर स्टॉलवाल्यांचे अतिक्रमण

काछीपुरा ते नीरी मार्गावर पिण्याच्या पाण्यासाठी लावलेल्या अस्थायी नळांवर स्टॉलवाल्यांनी ताबा मिळविला आहे. दुकानांसमोरीस नळांवर लोकांची गर्दी झाल्यास ग्राहकांना दुकानात येण्यास जागाच उरणार नाही, या भीतीने स्टॉलवाल्यांनी नळांना झाकून ठेवले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना इतरत्र भटकावे लागताना दिसले.

एसटीची व्यवस्था

भाविकांच्या सोयीसाठी शनिवारपासूनच एसटीची व्यवस्था करण्यात आली होती. काछीपुरा भागात अनेक एसटी बसेस भाविकांची ने-आण करताना दिसल्या.

एसटी महामंडळ कर्मचार्‍यांतर्फे भोजनदान


एस. टी. महामंडळ कर्मचार्‍यांतर्फे देसाई ड्रायव्हिंग स्कूलजवळ रहाटे कॉलनी येथे भोजनदान कार्यक्रम उद्या रविवारी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रादेशिक व्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता होईल. यावेळी विभाग नियंत्रक राजीव घाटोळे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील मेश्राम, विजय जनबंधू, निशिकांत धोंडसे, प्रवीण भोगे, प्रमोद कोंडावले परिश्रम घेत आहेत.

२२ सीसीटीव्हीद्वारे भाविकांवर नजर

दीक्षाभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. २२ सीसीटीव्हीद्वारे भाविकांच्या प्रत्येक हालचाली टिपण्यात येत आहेत. तसेच स्तुपात प्रवेश करणार्‍यांची कसून तपासणी केली जात आहे. यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर महिला पोलिसांसह साध्या वेषातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.