चंद्रपूर- वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूर हे मानवी वसाहतीस हानिकारक असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर येत्या काही वर्षात यावर वेळीच आळा न घातल्यास ते वन्यप्राण्यांसाठी घातक ठरणार असल्याची भीती वन्यजीव संशोधक , अभ्यासक ,जाणकार , तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशात प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर हे दुसऱ्या स्थानी आहे. उत्कृष्ठ व विपूल वनसंपत्ती हे या जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४१.५० टक्के क्षेत्र वनाखाली आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट दर्जाचे सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. याशिवाय जळाऊ लाकूड , तेंदूपत्ता , डिंक , मोह आदी वनउपजही आहेत. चंद्रपूर शहरालगत जंगल असून सुमारे ४५ किमी अंतरावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघाचा संचार असून देशातच नव्हे तर विदेशातही या प्रकल्पाची ख्याती आहे. मात्र शहरातील प्रदूषणाचा स्तर अद्याप स्थिर असून येत्या काही वर्षात यावर आळा न घातल्यास हे प्रदूषण वन्यप्राण्यांसाठी घातक ठरू शकेल , अशी भीती संशोधक , तज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे. जंगल परिसरात शहराच्या तुलनेत प्राणवायुची पातळी जास्त असते. पण ,अतिप्रदूषणाचा फटका वनस्पतींसोबतच वन्यप्राण्यांनाही बसू शकतो. वृक्षभक्षी प्राण्यांवर मांसभक्षी प्राणी अवलंबून असतात तर तृणभक्षी हे वनस्पतींवर अवलंबून असतात. वनस्पतींवर प्रदूषणाचा परिणाम होऊन ते नष्ट झाल्यास अन्नसाखळीला धक्का बसू शकेल , असे तज्ज्ञांचे मत आहे.
जंगलात प्रदूषणाची मात्रा कमी असते. मात्र येत्या काही वर्षात शहरातील वाढते प्रदूषण जंगलापर्यंत पोहोचणार आहे. हवेसोबत प्लास्टिक प्रदूषणाचा मोठा फटका वन्यप्राण्यांना बसण्याची भीती आहे.
- डॉ. पी.डी. कडुकर, पशुवैद्यकीय अधिकारी , चंदनखेडा
शहराच्या तुलनेत प्राणवायुची पातळी जंगलात जास्त असते. पण फ्लाय अॅश वनस्पतींवर बसल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जंगलात प्रदूषण होतच नाही , असे म्हणता येणार नाही.
डॉ. चित्रा राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी , वनविभाग (वन्यजीव)
हवेसह मातीवर होणाऱ्या प्रदूषणामुळे जंगलातील अन्न साखळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तृणभक्षी हे वनस्पतींवर अवलंबून असतात. वनस्पतींना प्रदूषणाचा फटका बसल्यास मांसभक्षी प्राण्यांच्या खाद्यावर परिणाम होऊन अन्नसाखळी नष्ट होईल.
डॉ. एस. एम. भोस्कुटे, वनस्पती वर्गीकरण तज्ज्ञ
वाढते प्रदूषण घातकच आहे. त्याचे कुठल्याही पातळीवर समर्थन शक्य नाही. कारण येत्या काही वर्षात त्याचे दुष्परीणाम दिसून येणार आहेत. वन्यप्राण्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
डॉ. एन. पी. दक्षिणकर, वन्यजीव तज्ज्ञ
वनस्पतींमध्ये सारे प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता असते. प्रदूषित परिसराचे ते शुद्धीकरण करण्याचे काम करते. वाढत्या प्रदूषणाचा मोठा फटका मानवासह वन्यप्राण्यांनाही बसू शकतो. त्यासाठी अभ्यास करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नीरीचे संशोधक तज्ज्ञ