সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 08, 2013

बस्स झाले... यापुढे एकही औष्णिक प्रकल्प नको

चंद्रपूर- शहरातील प्रदूषणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. प्रदूषणासाठी वीज केंद्राला जबाबदार धरण्यात आले आहे. त्याचा मानवासह वन्यप्राण्यांवरही परिणाम होणार असल्याचा निष्कर्ष सामाजिक संघटनांनी मांडला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी चंद्रपुरात यापुढे एकही औष्णिक प्रकल्प नको , अशी भूमिका मांडली आहे. डॉ. विकास आमटे यांनी प्रदूषणावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे सूचविले आहे. गृहणी मात्र प्रदूषणाच्या मुद्यावरून आक्रमक झाल्या आहेत. बस्स झाले... म्हणत कृती करण्याची मागणी केली आहे.

औष्णिक विद्युत केंद्रासह कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने उच्चतम सीमा गाठली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकही औष्णिक प्रकल्प यायला नको , असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले आहे. डॉ. बंग म्हणाले , चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करताना सर्वप्रथम प्रदूषणाची कारणे पाहणे आवश्यक आहेत. औष्णिक विद्युत केंद्रामुळे निर्माण होणारी उष्णता , कोळसा खाणीतून निर्माण होणारा धूर आणि धूळ , सिमेंट कारखाने , पेपर मील , फेरो अलॉय प्लान्टमधून होणारे रासायनिक प्रदूषण होते.चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात दारूची विक्रीही होतेे. तेव्हा दारू प्रदूषणाचीही त्यात भर पडली आहे.

कारणांचा शोध घेतल्यानंतर त्यावर कृती करणे आवश्यक आहे. यापुढे चंद्रपुरात नवा औष्णिक विद्युत प्रकल्प उघडायलाच नको. कारण त्यानेच प्रदूषणाची उच्चतम सीमा गाठली आहे. कोळसा खाणीतून निघणाऱ्या ' फ्लाय अॅश ' पासून रस्ते , विटा , सिमेंट तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग झाल्यास वातावरणात ते पसरणार नाही. कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक घटकांद्वारे पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याने प्रदूषणाची सीमा तोडली असल्याचा आरोपही डॉ. बंग यांनी केला.

जिल्ह्यात ५०० दारू दुकानांना परवाने दिले गेले आहेत. त्यातून वर्षाला ५०० कोटींच्या दारुची विक्री होते. त्यामुळे रासायनिक व आर्थिक वातावरण प्रदूषित झाले आहे. या सर्व मुद्दयांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. तेव्हाच सारे आवाक्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या प्रदूषणामुळे सर्वसामान्यांचे जीणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे त्वरित त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे.

अध्ययन करून उपाययोजना केल्यास तोडगा शक्य : डॉ. विकास आमटे

ऐतिहासिक शहर असलेले चंद्रपूर हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्धाधिक प्रदूषित शहर आहे. ही बाब निश्चितच अभिमानाची नाही. पर्यावरणाचे मुख्य केंद्र राहिलेल्या आनंदवनात सर्व संबंधितांनी येऊन बैठक घ्यावी. त्यातून तोडगा काढून उपाययोजना करावी , असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रपुरात राहणे म्हणजे रोगराईला आमंत्रण देण्यासारखे असल्याचा संताप गृहिणींनी व्यक्त केला. पद्मश्री चवरे म्हणाल्या , प्रदूषणाचा फटका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बसला आहे. आता बस्स झाले... कृती करा , असा संताप रजनी आंबेकर , शिवानी चौधरी , अश्विनी आंबटकर , सरिता काळे यांनी व्यक्त केला.

चंद्रपुरातील वाढते प्रदूषण नागरिकांसाठी जीवघेणे ठरत   आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे , असे प्रा. एस. एस. भुत्तमवार यांनी सांगितले.

देशातील अतिशय प्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूरचा दुसरा क्रमांक असणे हे घातक आहे. शहरासाठी ही बाब लाजीरवाणी आहे , असे मत प्रा. धनराज खानोरकर यांनी व्यक्त केले.

प्रदूषणाने शहरात मर्यादा पार केली आहे. सर्वसामान्यांना जगणेही कठीण होऊन बसले आहे. त्यावर वेळीच नियंत्रण आणण्याची गरज आहे , असे मत महेंद्र कन्नाके यांनी व्यक्त केले.

चंद्रपुरातील वाढते प्रदूषण घातक आहे. राजकारण्यांसह सारेच कुंभकर्णी झोपेते आहेत. सर्वांचे आरोग्य खराब होत असून हे शहर आत्ताच राहण्यालायकीचे नाही , असे मत एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी सांगितले.


--पंकज मोहरीर - 9822465756

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.