चौकशीअंती
पोलिसांनी केली सुटका
चंद्रपूर
: जिल्हा सामान्य
रुग्णालय येथील प्रसूती
कक्षातून नवजात बाळाला पळवून
नेत असल्याच्या संशयावरून
प्रमिला प्रमोद गहूकर या
महिलेस शनिवारी (ता.१९)
दुपारी १२ वाजताच्या
सुमाराला अटक करण्यात आली.
मात्र, महिला
वेडसर असून, ती दोन
दिवसांपासून घरून निघून गेली
होती. शहानिशा
झाल्यानंतर या महिलेस पोलिसांनी
सोडून दिले.
स्थानिक
बालाजी वॉर्डातील रहिवासी
प्रमिला प्रमोद गहूकर ही महिला
विश्वकर्मा चौकात राहते.
मागील अनेक दिवसांपासून
ती मानसिकरित्या अशक्त असून,
वेडसरपणात कधीकधी
घरूनही निघून जाते. शुक्रवारपासून
ती बेपत्ता होती. यासंदर्भात
शहर पोलिस ठाण्यात तक्रारही
देण्यात आली होती. शनिवारी
जिल्हा सामान्य रुग्णालयात
बालरोग कक्ष वॉर्ड क्रमांक
१९ मध्ये आली. एका
नवजात बाळात ती कुशीत घेऊन
होती. तिच्या
वर्तणुकीवर संशय आल्याने
काही महिलांनी तिला याबाबत
विचारणा केली, तेव्हा
घाबरून तिने पळ काढला.
दरम्यान काही महिला
आणि सुरक्षारक्षकांनी तिला
अडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिने
एका महिलेच्या हाताला चावा
घेऊन आपली सुटका केली. समोर
एका सुरक्षारक्षकाने तिला
पकडले. त्याचा
तावडीतून सुटका करण्यासाठी
त्याच्या हाताला चावण्याचा
प्रयत्न केला. मात्र,
गर्दी जमल्याने ती
लोकांच्या तावडीत सापडली.
त्यानंतर
तिला पोलिसांच्या स्वाधीन
करण्यात आले. रविवारी
सकाळी वृत्तपत्रात बातमी
वाचल्यानंतर कुटुबीयांना
बेपत्ता असलेल्या प्रमिलासंदर्भात
माहिती कळली. ती
वेडसर असल्याने ती घरून निघून
गेली होती. मूल
चोरण्याचा तिचा कोणताही उद्देश
नव्हता. लहान बाळांचे
तिला आकर्षण असल्याने ती
रुग्णालयात जावून बाळंतीण
मातांसोबत बोलणे, नवजात
बाळांना सांभाळणे, त्यांची
देखभाल करणे, अशी
कामे ती करायची. त्यामुळे
पोलिसांनी चौकशीअंती तीला
मुक्त केले.