पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना `देहाती औरत' म्हटल्याचा आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेली एन.डी.टीव्हीची पत्रकार बरखा दत्त चुपचाप मिठाई खात राहिली, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका जुन्या प्रश्नावर नव्याने मंथन सुरु झाले आहे. तो प्रश्न आहे, `पत्रकाराची भूमिका काय असावी?'
`पत्रकाराची भूमिका काय असावी?' या प्रश्नावर `पत्रकार हा प्रथम पत्रकार असतो' असा एक जोरदार आणि जोमदार दावा केला जातो. तो पत्रकार असतो न्यायाधीश नसतो, त्यामुळे त्याने कोणता निवाडा करू नये. किंवा सगळ्या बाजू स्वच्छपणे समाजासमोर याव्यात म्हणून त्याने कोणतीही एक बाजू घेऊ नये, असे म्हटले जाते. पत्रकाराची निष्पक्षता हा त्याचा पहिला गुण समजला जातो. ते योग्यही आहे. ते त्याचे कर्तव्य आहे आणि तो त्याचा धर्मही आहे. असे असताना त्यावर चर्चा का होते?
मागे कारगिल युद्धाच्या वेळीही बरखा दत्त हिच्याच `ground report' वरून याच प्रश्नाची चर्चा झाली होती. मुंबई शहरावरील दहशतवादी हल्ल्यानंतरही अशीच चर्चा झाली होती. आपली इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमे जे अति उत्साही वार्तांकन दाखवित होती ते पाहून; पाकिस्तानातील अतिरेकी मुंबईतील आपल्या लोकांशी संवाद साधत होते. त्यावेळीही `देशभक्ती' की `व्यवसायधर्म' अशी चर्चा झडली होती.
या चर्चेत पत्रकाराची निष्पक्षता हा एक मुद्दा पुढे करून अनेक बाबींकडे डोळेझाक केली जाते. पहिला मुद्दा हा की, पत्रकारिता हा एक व्यवसाय आहे. त्यालाही अन्य व्यवसायांप्रमाणे काही मर्यादा आहेत आणि त्या तशा असायलाच हव्यात. व्यवसाय कोणताही असो- वैद्यकीय, अभियांत्रिकी, खानावळ, शिक्षण, धान्य, कपडे, सौंदर्यवृद्धी- त्याच्या परिणामांची जबाबदारी तो व्यवसाय करणाऱ्यांचीच असते. शिवाय या परिणामांचा विचार, ते परिणाम होण्याआधीच संबंधित व्यावसायिकाने करायला हवा. ज्या देशात तो व्यवसाय करतो त्या देशातील कायदे, नीतीनियम, सामाजिक मान्यता आणि सुरक्षा यांच्या मर्यादेतच त्याने व्यवसाय करायला हवा. तसे तो करत नसेल तर ते नियमबाह्य, घटनाबाह्य आणि अनैतिक असेच म्हणायला हवे. हाच नियम पत्रकारितेलाही लागू व्हायला हवा.
ही काही नवीन अपेक्षा आहे असेही नाही. सामाजिक उपद्रव होतो तेव्हा संबंधित समुदायांची नावे सांगू नयेत, लिहू नयेत किंवा त्यांचा नामोल्लेख करून चर्चा करू नये असे संकेत आहेत आणि ते बऱ्याच प्रमाणात पाळलेही जातात. बलात्कारित वा पिडीत मुलीची वा महिलेची ओळख जाहीर करू नये अशीही पद्धत पत्रकारितेत आहे. त्यामागे हीच जबाबदारीची भावना असते. मग जे सामाजिक बाबतीत केले जाते वा त्याबाबत जी विशिष्ट व्यवहाराची अपेक्षा केली जाते ती राष्ट्रीय सुरक्षेच्या व स्वाभिमानाच्या बाबतीत गैर का ठरावी? अगदी आजही हेच सुरु आहे. सध्या जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये पाक अतिरेक्यांनी घुसखोरी केलेली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून आपले बहाद्दर जवान त्यांचा बंदोबस्त करीत आहेत. आमचे दूरचित्रवाणीचे पत्रकार त्यांच्या मागेमागे कॅमेरा घेऊन धावत आहेत. कशासाठी हा तमाशा?
पत्रकारिता कशासाठी? `to entertain, educate and enlighten' हे पत्रकारितेचे ध्येय असल्याचे पत्रकारिता अभ्यासक्रमात शिकवले जाते. ते अतिशय योग्य आहे, पण म्हणून केव्हा, कोठे, किती आणि कशाचे याचे तारतम्य सोडून द्यायचे की काय? देशाच्या सीमांचे, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे, संरक्षण योजनांचे, लढाईचे वगैरे शिक्षण आणि माहिती द्यायची आहे तर द्या ना. कोण अडवतो? पण त्याची वेळ कोणती? युद्ध सुरु असताना? संघर्ष सुरु असताना? महत्वाच्या राजकीय वार्ता सुरु असताना? का? कोणत्या वेळेला कोणती माहिती दिली, कशा पद्धतीने दिली तर त्याचे काय आणि कसे परिणाम होतील? अमुक वेळेला अमुक गोष्टीची गरज आहे का? किती गरज आहे? कशाचाही विवेक, तारतम्य ठेवायला हवे की नाही? माहिती देणे, शिक्षण देणे, मनोरंजन करणे हे आमचे काम आहे म्हणून उद्या सेलीब्रिटीच्या अंतर्वस्त्रांचे ब्रांडस सांगाल. कशासाठी? ते नाही पोहोचले लोकांपर्यंत तर काही अडते का? माहिती वा बातमी पोहोचवताना त्याची गरज किती? त्याचे परिणाम काय? त्याची योग्य- अयोग्य वेळ यांचे भान सोडून देण्याचे काय कारण?
एखादी व्यक्ती पत्रकार असते, याचा अर्थ ती व्यक्ती पत्रकार म्हणूनच जन्माला येते वा मरतानाही पत्रकारच असते असे नाही. अगदी पत्रकार म्हणून काम करतानाही ती नेहमीच पत्रकार नसते. घरी, कुटुंबात, नोकरीत, खाजगी आयुष्यात ती पत्रकारितेचा मुखवटा काढूनही अनेकदा वावरत असते नव्हे ते आवश्यक असते. बातमीशी, घडामोडींशी त्या व्यक्तीची बांधिलकी असली पाहिजे, त्यासाठी कामाच्या वेळा वगैरे सबबी त्याने सांगायला नको. येथवर ठीक आहे. पण एखाद्या पत्रकाराच्या मुलाने काही चूक केली तर त्याचे प्राधान्य आपल्या मुलाच्या त्या चुकीची बातमी देण्याला राहील की त्याची चूक दुरुस्त करायला?
तपशिलाची ही चर्चा बरीच वाढवता येईल. मूळ मुद्दा हा आहे की, पत्रकारिता ही एखाद्याची भूमिका असते. ही भूमिका पार पाडताना त्याच्या बाकीच्या भूमिका अस्तंगत होऊ शकत नाहीत. इतरांप्रमाणेच पत्रकारही एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असतो, नव्हे त्याने त्या निभावायला हव्यात. एखादा नट रंगमंचावर एखादी भूमिका समरस होऊन पार पाडीत असेल आणि त्याच वेळी समजा रंगमंचावर आग लागली तर त्याने काय भूमिकेतच वावरायचे की, कोणताही विचार न करता आग विझवायची? खलनायकाची भूमिका करणाऱ्यालाही घरी आल्यावर लक्षात ठेवावेच लागते की आपण पती आहोत, पिता आहोत, पुत्र आहोत वा मित्र आहोत. मग पत्रकारांनीच तेवढे आम्ही पत्रकार आहोतचा धोशा लावत राहण्यात काय अर्थ. तुम्ही पत्रकार आहात त्याच वेळी तुम्ही जबाबदार नागरिक आहात, देशभक्त आहात, समाजाचे एक घटक आहात, संवेदनशील माणूस आहात. एक भूमिका पार पाडताना अन्य भूमिका विसर्जित होत नसतात.
विशिष्ट संदर्भामुळे `राजधर्म' या शब्दाची खूप चर्चा होते. पण प्रत्येकच गोष्टीचा एक धर्म असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. पत्रकारितेचाही `पत्रकार धर्म' असतो. आणि या अर्थाने जेव्हा `धर्म' शब्द वापरला जातो त्याचा अर्थ कर्तव्य, जबाबदारी आणि हेतू (लक्ष्य) या तिन्हींच्या संमिश्रणातून होणारा विचारबोध आणि व्यवहारबोध असा होतो. पत्रकारांनी आणि पत्रकारितेनेही `पत्रकार धर्माचे' भान सतत ठेवले पाहिजे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ७ ऑक्टोबर २०१३
https://www.facebook.com/shripad.kothe