चंद्रपूर- लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर अयप्पा स्वामी मंदिर परिसरात घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुमीत जगदीश सरकार (२९) असे फिर्यादीचे नाव आहे. सुमीत हा दुर्गापूर डब्लूसीएलमध्ये नोकरीला आहे. तो नोकरीहून रात्री ८ वाजता दुचाकीने परतत असताना नेहरूनगर अयप्पा स्वामी मंदिर परिसरात दोन अनोळखी युवकांनी त्यांना लिफ्ट मागितली. माणुसकीच्या नात्याने सुमीतने दुचाकी थांबवून त्यांना लिफ्ट दिली. दरम्यान, रस्त्याने येत असताना अर्ध्यात युवकांनी सुमीतच्या मागील खिशातील पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमीतने दुचाकी थांबवून युवकांना खाली उतरवले.
दरम्यान, युवकांनी सुमीतला मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील साडेसात हजार रुपये लुटले व पळ काढला. मारहाणीत सुमीत बेशुद्ध होवून रस्त्यावर पडला. काही नागरिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी सुमितला शुद्धीवर आणले. यानंतर सुमितने रामनगर पोलिस ठाण्यात अनोळखी युवकांविरूद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी युवकांविरूद्ध भादंवि कलम ३४९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.