चंद्रपूर। चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर उसळलेल्या जनसागराने आज पुन्हा 57 वर्षापूर्वीच्या सोनेरी दिवसाची आठवण करून दिली. येथील दीक्षाभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून आणि विदेशातूनही आलेल्या अनुयायांच्या गर्दीने आज चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर जणू निळाईच अवतली. ‘जयभीम’च्या घोषणा आणि जत्थ्याजत्थ्याने येणार्या अनुयायांच्या अलोट गर्दीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चंद्रपूरच्या मुख्य मार्गाने अस्थिकलशाची मिरवणूक निघाली. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांनी १६ ऑक्टोबर १९५६ ला हजारो बौद्ध बांधवांना भगवान बुद्धांच्या धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांच्या पदचिन्हांनी पावन झालेल्या या पवित्र भूमीवरून धम्माची प्रेरणा मिळत रहावी, यासाठी डॉ. बाबासाहेबांचा अस्थिकलश दरवर्षी दर्शनार्थ ठेवला जातो. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून फुलांनी सजविलेल्या एका वाहनातून अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो अनुयायांसह देश-विदेशातून आलेला भिक्खू संघ व समता दलाचे सैनिक सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत ‘जयभीम’चे नारे देण्यात आले.
update- 12.50 pm/16 oct.2013