সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 20, 2013

गणेशभक्तीसोबत केली पर्यावरणाची रक्षा

  प्रशांत विघ्नेश्‍वर (लोकशाही वार्ता)
चंद्रपूर- श्रीगणेशाची पूजा.. सारेच भक्त गणेशभक्तीत तल्लीन.. अनेक सामाजिक उपक्रमाची सार्वजनिक मंडळात रेलचेल.. नयनरम्य देखावे.. त्या देखाव्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी.. कुठे गणेशमूर्तीचे आकर्षण तर कुठे देखाव्याचे आकर्षण.. कधी डीजेच्या तालावर नाच तर कधी भजनाचा आस्वाद.. सारे वातावरण आनंदमय.. पाहता पाहता दहा दिवस ओसरले.. आणि उजाडला गणेशाच्या विसर्जनाचा दिवस. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सारेच सरसावले. परंतु, यातील बोटावर मोजण्याइतक्या गणेशभक्तांनी जाणीवपूर्वक पर्यावरणाची रक्षा केली. शहरात गणेश विसर्जनाची तलाव आणि नदीवर झुंबड उडाली असताना हे गणेशभक्त मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला बादली, पाण्याची टाकी व स्विमिंग टँकमध्ये विसर्जन करून निरोप देत होते. ही कपोलकल्पीत गोष्ट नसून 'इको-प्रो' या सामाजिक संस्थेने चालविलेल्या 'ग्रीन गणेशा' उपक्रमाचे फलित होय. 
                                           
नरकेसरी लोकमान्य टिळकांनी समाजाला एकसूत्रात बांधून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना गावोगावी केली. या उत्सवातून समाज जागृतीचे कार्य केले जात होते. नागरिकांच्या मनात ज्वाजल्य देशभक्ती निर्माण करण्याचे कार्य यानिमित्ताने झाले. तेव्हापासून आजतागायत हा उत्सव देशात साजरा केला जातो. कालांतराने या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. ऐरवी उत्सवानिमित्त होणार्‍या व्याख्यानमालेतील प्रबोधनाच्या जागेवर ऑर्केस्ट्राने कब्जा मिळविला. त्यावेळी ऑर्केस्ट्रा समूहाला बरेच उधाण आले. परंतु, नंतर रात्री १0 पर्यंतची परवानगी सार्वजनिक कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ऑर्केस्ट्रा, कव्वाली, मिमीक्री यासारखे लोकांच्या आवडीचे विषय कालबाह्य ठरले. परंतु, गणेश मंडळांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी नवीन शक्कल लढविली. पाहता पाहता गणेश मूर्त्यांचे आकार अवाढव्य झाले. या आकारावर कुणाचेच बंधन राहिले नाही. यातच गणेशमूर्तीला आकर्षित करण्यासाठी रासायनिक रंग, थर्माकोल इत्यादींचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आणि समाजाला दिशा देणारा गणेश उत्सव दिशाहिन होऊन साजरा केला जाऊ लागला. परिणामी, त्याचे परिणाम पर्यावरण संतुलनावर झाले. गणेश उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापरही मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. चंद्रपूर शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून उदयास येत असतानाच इको-प्रो या संस्थेने २00६ मध्ये या प्रकरणी आवाज बुलंद केला. आणि नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या माध्यमातून नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची स्थापना करू नये, रासायनिक रंगाचा वापर करू नये, थर्माकोलचा वापर करू नये, मूर्तींचा आकार र्मयादेत ठेवून त्याचे विसर्जन घरीच करावे, असे अनेक आवाहन केले. तर गणेश मंडळांनी मातीच्या मूर्तीचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले. या आवाहनाला मोजक्याच लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातही विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद खरोखरच वाखानन्याजोगा आहे. २00८ मध्ये रामाळा तलावात 'इकोर्निया' वनस्पतीची चादर पाण्यावर पसरली. शहराच्या मध्यभागी चंद्रपूरची शान असणारा हा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर होता. त्यावेळी इको-प्रो संस्थेने संपूर्ण तलाव आटवला. तेव्हा मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांंची झालेली विटंबना समोर आली. तेव्हापासून हे अभियान आणखी जोमाने राबविण्याचा संकल्प इको-प्रोने सोडला.
प्रारंभी ही योजना इको-प्रो पर्यावरणपूरक गणेश उत्सव या नावाने राबविण्यात आली. परंतु मोठय़ा गणेशभक्तांचा या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मात्र बालमनावर या संदर्भातील संस्कार करण्याचा निर्धार इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे यांनी केला. उद्याच्या नागरिकाला पर्यावरणाचे महत्त्व कळले तर तो पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे धजावेल, ही बाब बहुदा इको-प्रोच्या सदस्यांना माहित होती. त्यांनी यासाठी जिल्ह्यातील शेकडो शाळांना गाठले आणि चंद्रपूर शहरातील २५ शाळांमध्ये इको-प्रो स्कूल क्लब स्थापित झाले. या क्लबच्या माध्यमातून २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंंत पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची संकल्पना पोहचली. आणि त्या विद्यार्थ्यांंनी ही संकल्पना आपल्या आजी-आजोबा, आई-बाबा आणि नातेवाईकांसमोर मांडली.
यातील काही लोकांनी या संकल्पनेचा स्वीकार केला असून ज्यांनी स्वीकार केला त्यांनीच काल बुधवार (१८ सप्टेंबर)ला रामाळा तलाव व इरई नदीमध्ये विसर्जन सुरू असताना घरातील बादली, पाण्याची टाकी, स्विमिंग टँकमध्ये गणेशाचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला. समाज सुधारायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागते, ही बाब या गणेशभक्तांनी कृतीतून सिद्ध केली.
आई आपल्या मुलाला घरी संस्कार देऊन घडवित असते. त्यानंतर त्यावर संस्कार घडविण्याचे कार्य शिक्षकांतर्फे केले जाते. अनेकवेळा तर बहुतांश पालक आणि समाज विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे होतात. आणि काही घडलेच तर त्याचा दोष शिक्षकांना दिल्या जातो. तरीही शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अहोरात्र पर्शिम घेत असतात. परंतु, आता पर्यावरणपूरक विद्यार्थी घडविण्याची संकल्पना इको-प्रोच्या माध्यमातून राबविली जात आहे. इको-प्रोने २५ इको-प्रो स्कूल क्लब स्थापन केले असले तरी त्याचा अंगिकार मात्र येथील चांदा पब्लिक स्कूलने केलेला आहे. मागील तीन वर्षांपासून या शाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. यासाठी शाळा व्यवस्थापन हिरीरिने पुढाकार घेत असते.
पर्यावरण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे या शाळेतील मूर्ती शाडुच्या मातीने व कागदाच्या लगद्याचा वापर करून तयार करण्यात आली. एवढेच नव्हे तर मूर्तीला रंगरंगोटी करण्यासाठी चुना, हळद, कुंकू, गुलाल-बुक्का याचा वापर करण्यात आला. कला शिक्षक मोनाली बावणकर यांच्या पुढाकारातून गणेश मूर्ती साकारण्यात आली. पुढे दहा दिवस या मूर्तीची स्थापना करून रोज सकाळी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या आरतीत प्रार्थनेच्या वेळी सहभाग घेतला. जणू दहा दिवस बुद्धीच्या देवतेची प्रार्थना हे विद्यार्थी करीत होते. शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना या निमित्ताने मागील तीन वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे जणू प्रशिक्षण दिले जात आहे. शाळेने निर्माल्य संकलनासाठी एक कुंडही तयार केले होते. सरतेशेवटी गणेश मूर्तीचे विसर्जन प्रि-प्रायमरी स्कूलच्या स्विमिंग टँकमध्ये आदराने करण्यात आले. शाळेच्या संचालिका स्मिता जिवतोडे व प्राचार्य भावना व्ही.एस. यांच्या प्रोत्साहनामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला. त्यामुळे चांदा पब्लिक स्कूल घडवित आहे पर्यावरणपूरक विद्यार्थी, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मातीच्या मूर्तीचीच परंपरा जोपासणे आवश्यक : धोतरे
आपल्या संस्कृतीमध्ये असलेला कोणताही उत्सव पर्यावरणाला धोका निर्माण करणार नाही, याची काळजी घेऊनच त्या उत्सवांची योजना पूर्वजांनी आखली होती. त्यामुळेच पूर्वी मातीच्या मूर्तीचे प्रचलन होते. नागरिक पोळा उत्सवादरम्यान मातीच्या बैलाची तर आठवीच्या सणाला मातीचा हत्ती बनवून त्याची पूजा करतात व त्या मातीचा पुनर्वापर व्हावा म्हणून त्या मूर्ती झाडाखाली ठेवण्यात येतात. हाच दृष्टिकोन गणेश उत्सव सुरू झाला तेव्हाही होता. परंतु, काळाच्या ओघात आधुनिकतेच्या नादात उत्सवाचे स्वरूप बदलले. हा उत्सव पर्यावरणाला नुकसान पोहचवणारा केव्हा झाला हेही कोणाला कळले नाही. तरीही आता वेळ गेलेली नसून मातीच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा जोपासली जाऊ शकते. चंद्रपूर सारख्या अतिप्रदूषित शहरातील नागरिकांनी ही परंपरा जोपासणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया इको-प्रोचे संस्थापक बंडू धोतरे यांनी दिली.

साभार- (लोकशाही वार्ता)

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.