সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 21, 2013

जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस

चंद्रपूर : १५ ते २0 दिवसांच्या विश्रांतीनंतर वरूणराजा पुन्हा सक्रिय झाला आहे. आज जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या या पुनरागमनाने काही भागातील शेतकरी आनंदी झाले असले तरी काही भागातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
जाणकारांच्या मते रिमझिम पाऊस पडत राहिला तर तो पिकांसाठी व पुढे रब्बी हंगामासाठी फायद्याचा आहे. मात्र मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसला तर पिकांची पुन्हा नासाडी होण्याची शक्यता आहे. आज जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र बहुतांश भागात संततधार पाऊस बरसला.
उल्लेखनीय असे की पावसाने यंदाचा खरीप हंगाम खाऊन टाकला. दरवर्षीचे कटू अनुभव विसरून यंदा बळीराजाने मोठय़ा उत्साहाने पेरणी केली होती. कृषी विभागानेही प्रारंभी चार लाख ५८ हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन केले होते. यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ३ हजार हेक्टरवर कापूस तर एक लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकांचा समावेश होता.
यंदा प्रारंभापासूनच पावसाने अतिरेक करणे सुरू केले. पेरणी झाल्यानंतर २५ व २६ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या पेरण्यांचा खेळखंडोबा केला. अनेकांची बिजाई वाहून गेली. आधी कर्जबाजारी होऊन कसेबसे बियाणे खरेदी केले. तेही हंगामाच्या प्रारंभीच वाहून गेल्याने शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज काढून दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर पाऊस बरसतच राहिला. जुलै महिन्यात तर पावसाने कहर केला. अतवृष्टीमुळे जिल्हाभरातील नदी-नाल्यांना पूर येऊन शेतात, नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यानंतर जणू पुराची श्रृंखलाच निर्माण झाली. जिल्ह्यात एक, दोन नव्हे तर तब्बल चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र हाहा: कार उडाला. जिल्ह्यात कोट्यवधींची हानी झाली. २५ ते ३0 लोकांचा बळी गेला. खुद्द मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात यावे लागले. मदतीसाठी ओरड होऊ लागल्यानंतर महसूल आणि कृषी विभागाला तातडीने सर्वेक्षण करावे लागले. दोन लाख ३९ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. यात सोयाबीन-८७ हजार ८४२ हेक्टर, कापूस- ८१ हजार ३३४ हेक्टर व धान-५४ हजार ९६७ हेक्टर असा नुकसानीचा आकडा आहे. प्रत्यक्षात याहून अधिक नुकसान झाले आहे. शासनाने खरडून गेलेल्या पिकांसाठी प्रति हेक्टर २0 हजार रुपये आणि ५0 टक्क्याहून अधिक नुकसानग्रस्तांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्ष एकाही शेतकर्‍यांना मदत दिली नाही.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाने दिर्घ विश्रांती घेतली. त्यामुळे उरलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी पुन्हा कामाला लागले. अशातच आज जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, मूल, सावली, ब्रह्मपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. वरोरा, भद्रावती परिसरात तुरळक पाऊस झाला. असा पाऊस पिकांना उपयोगाचा असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान आहे. मात्र राजुरा, कोरपना, मूल, जिवती तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत बर्‍याच ठिकाणी पाऊस सुरूच होता. पावसाचे बरसणे असेच सुरू राहिले तर शेतकर्‍यांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. 
जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी पाऊस मुसळधार स्वरुपाचा नव्हता. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांनी खते टाकली आहेत. रिमझिम पाऊस असला तर ही खते पिकांच्या मुळाशी जाऊन परिणामकारक ठरतात. त्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहेत. मात्र राजुरा, कोरपना, जिवती, मूल तालुक्यात संततधार पाऊस बरसल्याने शेतात पाणी साचले आहे. अशावेळी कपाशीची मुळे सडून कपाशी पिवळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे येथील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. चंद्रपुरात आज सकाळी पाऊस बरसला. त्यानंतर काही तास पावसाने उसंत घेतली. सुर्याचे दर्शनही झाले. त्यामुळे नागरिक निवांत घराबाहेर पडले. मात्र सायंकाळी ४ वाजतापासून काळे ढग दाटून दमदार पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची व फुटपाथवरील व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.