সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 13, 2013

केंद्रीय समितीकडून पूरपरिस्थितीची पाहणी

आठ दिवसांत अहवाल देणार :

चंद्रपूर : अतवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात शेतीचे, शेतपिकाचे व घरांचे मोठे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून पाहणीचा अहवाल आठ दिवसांत केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे कापूस विकास संस्थेचे संचालक तथा केंद्रीय समितीचे सदस्य एस.एम. कोल्हटकर यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात अतवृष्टी व पुराने यंदा कहर केला. सतत चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल रात्री केंद्रीय समिती चंद्रपुरात दाखल झाली. कापूस विकास संस्थेचे संचालक एस.एम. कोल्हटकर, केंद्रीय कार्यकारिणी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) अभिषेक कुमार व काही अधिकारी यांचा या समितीत समावेश होता. समितीने चंद्रपूर शहरातील संजयनगरपासून आपला पाहणी दौरा सुरू केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) निरंजन तेलंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव, उपविभागीय अधिकारी भूगावकर, तहसीलदार गणेश शिंदे, प्रसाद मते व अधिकारी उपस्थित होते.संजयनगर येथे भेट देऊन येथील अतवृष्टीमुळे पडलेल्या घरांची पाहणी केली. दुकालू दमा व महम्मद बाबूजान या नागरिकांशी संवाद साधून त्यांना मिळालेल्या मदतीची माहिती घेतली. दरम्यान, अभिषेक कुमार व काही अधिकार्‍यांची चमू मार्गांची पाहणी करण्यासाठी दुसरीकडे रवाना झाली.
कोल्हटकर व काही अधिकार्‍यांच्या चमूने संजयनगरची पाहणी केल्यानंतर देवी महाकालीच्या मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर हा ताफा विश्रामगृहात दाखल झाला.
वेकोलिच्या विश्रामगृहावर समितीने एक बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केंद्रीय समितीसमोर अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचे सादरीकरण केले. जिल्ह्यात २ लाख ३९ हजार ११२ हेक्टर जमिनीवरील ५0 टक्केपेक्षा जास्त शेतपिकांचे नुकसान झाले असून १ लाख ४ हजार ९२२ हेक्टरवरील पिकांचे ५0 टक्केपेक्षा कमी नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ४४ हजार ३४ हेक्टर शेतजमिनीवरील नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सादरीकरणात सांगितले.
शेतपिकाच्या नुकसानीचा यात समावेश असून कापूस पिकांचे ८४ हजार ३३४ हेक्टर नुकसान झाले आहे व ८७ हजार ८४२ हेक्टर सोयाबीन, ५0 हजार ९९९ हेक्टर धान, ९ हजार ४५0 हेक्टरवरील तूर व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सादरीकरणात सांगितले. चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील १५ हजार ९0९ घरांचे अंशत: किंवा पूर्णत: नुकसान झाले आहे, असे जिल्हाधिकारी यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर सदर समितीने भद्रावती येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी केली. खंडाळा रिठ या गावातील सुधाकर भदुजी बल्की, रामप्रसाद गयाप्रसाद जयस्वाल, अनिल नानाजी मत्ते या शेतकर्‍यांच्या शेतीची पाहणी करून शेतकर्‍यांशी चर्चा केली. कोल्हटकर यांनी सुधाकर बल्की यांना सोयाबीनची पेरणी केव्हा केली, असा प्रश्न केला. त्यांनी जून महिन्यात केल्याचे सांगताच कोल्हटकरांनाही धक्का बसला. सोयाबीनला अजूनही शेंगा लागलेल्या नव्हत्या. आता शेंगा लागणे व पीक निघणे कठीण असल्याचे त्यांनी मान्य केले.
दरम्यान, या भागात कापूस व सोयाबीन या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. येथील कापूस उत्पादक शेतकरी रामप्रसाद जयस्वाल यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती कोल्हटकर यांनी घेतली. त्यानंतर खांबाडा येथील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी समितीने केली.
अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल योग्य असल्याचे मत कोल्हटकर यांनी यावेळी व्यक्त केले. आपण आपला अहवाल आठ दिवसात केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नागपूर येथील विभागीय बैठकीसाठी समिती नागपूरकडे रवाना झाली. 

खासदारांच्या मागण्या
केंद्रीय समितीचे एस.एम. कोल्हटकर हे विश्रामगृहात असताना खासदार हंसराज अहीर यांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर तीन मागण्या ठेवल्या. यात वेकोलिचे ओव्हरबर्डन हटवावे. कारण याच ओव्हरबर्डनमुळे पिपरीसारख्या गावांना पुराचा वेढा पडतो. दुसरे ८0 टक्के शेतकर्‍यांनी कृषी कर्ज घेतले आहे. त्यांचे कृषी कर्ज तात्काळ माफ करावे. आणि महत्त्वाचे म्हणजे ४५ दिवस पाऊस असल्याने शेतमजुरांनाही कामे नव्हती. त्यामुये प्रत्येक कुटुंबांना खावटी वाटप करावे. जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालावर समाधान
चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर नुकसानीचा अहवाल तयार करून शासनाला पाठविण्यात आला. या अहवालावर कोल्हटकर यांनी समाधान व्यक्त करीत तो योग्य असल्याचे सांगितले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.