- देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - मोठ्या प्रमाणात वापरलेल्या विजेचे बिल भरण्यात येत नसल्याने पूर्व विदर्भातील विविध ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा 128 कोटींवर पोहोचला आहे. चालू बिल भरण्यासाठी मुभा देऊनही शासकीय कार्यालयाकडून निधी नसल्याचे कारण सांगून थकबाकी ठेवली जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांत नागपूर परिमंडळामार्फत वीजपुरवठा होतो. शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात भरभराटी यावी, यासाठी शासनातर्फे सवलतीच्या दरात वीज देण्यात येत आहे. घरगुती ग्राहकांना सवलतीच्या 5.56 पैसे प्रतियुनिट दराने ती उपलब्ध होते. ही रक्कम औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवर ज्यादा भारप्रमाणे वसूल केली जाते. सध्या हा दर नऊ रुपये प्रतियुनिट आहे. असे असतानाही ग्राहक वापरलेल्या विजेचे पैसे भरण्यास उदासीन दिसून येत आहेत.
चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया व भंडारा शहरांतील पथदिव्यांची थकबाकी 24 कोटींवर पोहोचली आहे. यात चंद्रपूर महानगरपालिकेकडे आठ कोटी 64 लाख रुपये, गडचिरोलीमधील नगरपालिकेकडे 10 कोटी 38 लाख, वर्धा नगरपालिकेकडे एक कोटी 72 लाख, गोंदिया नगरपालिकेकडे 2 कोटी 32 लाख, भंडारा नगरपालिकेकडे 96 लाख 84 हजारांची थकबाकी आहे. शासकीय कार्यालयाकंडेही सुमारे एक कोटी तीन लाखांची थकबाकी आहे. पाच जिल्ह्यांतील 1 हजार 780 पाणीपुरवठा योजनांकडे तीन कोटी 74 लाख थकीत आहेत. चंद्रपूर पाणीपुरवठा योजनांकडे 95 लाख, गडचिरोली 55 लाख, वर्धा एक कोटी 62 लाख, गोंदिया 24 लाख 19 हजार व भंडारा पाणीपुरवठा योजनांकडे 36 लाख 92 हजारांची थकबाकी आहे.
थकीत रक्कम (पूर्व विदर्भ)
- कृषिपंपधारक- 67 कोटी 69 लाख
- घरगुती ग्राहक- 22 कोटी
- वाणिज्यिक- सहा कोटी 78 लाख
- औद्योगिक- तीन कोटी 15 लाख
- पाणीपुरवठा योजना- तीन कोटी 74 लाख
- पथदिवे- 24 कोटी 4 लाख
436 कृषिपंपाची वीज कापली
पाच जिल्ह्यांत एकूण एक लाख 48 हजार 426 कृषिपंपधारक असून, त्यांच्याकडे 67 कोटी 69 लाखांची थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरल्याने गेल्या चार दिवसांत 436 कृषिपंपाची वीज कापण्यात आली. यात वर्धा 401, भंडारा 17, गडचिरोली 10, चंद्रपूर 4, गोंदिया 4 कृषिपंपधारकांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सहा कोटी 45 लाख 38 हजारांची थकबाकी, भंडारा 13 कोटी 84 लाख 99 हजार, गडचिरोली पाच कोटी 82 लाख, वर्धा 37 कोटी 62 लाख; तर गोंदियात तीन कोटी 94 लाख 21 हजारांची थकबाकी आहे.