सार्वजनिक गणेश मंडळांकडून नोंदणी तसेच पोलीस विभागाकडून लागणारी परवानगी घेण्याची प्रक्रीया अतिशय मंदगतीने होत असल्याने जिल्ह्यातील गणेश मंडळाचा नेमका आकडा आज स्पष्ट झाला नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी दुपारपर्यंत रामनगर पोलीस ठाण्यात परवानगीसाठी ६५, तर शहर पोलीस ठाण्यात २0 अर्ज दाखल झाले होते. दुर्गापूर पोलीस ठाण्यात १0 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दिले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनाच्या एक दिवसांपूर्वीपर्यंत अर्जाची प्रक्रीया सुरू राहते. रामनगर ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरी क्षेत्रात किमान १२0 ते १२५ व ग्रामीण क्षेत्रात १८ सार्वजनिक मंडळे गणेशाची स्थापना करतात. मात्र अद्याप या सर्वांचे अर्ज रामनगर पोलिसांना प्राप्त झाले नाहीत. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपेक्षेपेक्षा अतिशय कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४0 ते ४५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मात्र त्यांपैकी केवळ १0 मंडळांनीच अर्ज दिले.
संपूर्ण जिल्ह्यात मनोभावे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. कुठे एक गाव एक गणपती, तर कुठे दोन गाव एक गणपतीची कल्पना प्रत्यक्षात साकार केली जात आहेत. मागील वर्षी एक हजार ४00 मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.