बांधकाम करण्याची आ. नाना श्यामकुळे यांची मागणी
चंद्रपूर, २७ सप्टेंबर
सन २०११ ते २०१३ या वर्षात एकूण ६४३ अंगणवाडीच्या इमारत बांधकामास मंजुरी प्राप्त झाली असून, अद्याप केवळ १६३ अंगणवाडी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर, २७७ अंगणवाडी इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. मात्र, २०३ अंगणवाडीचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. योग्य प्रकारे नियोजन न झाल्यामुळे हे बांधकाम रखडलेले असून, लहान मुलांना चांगल्या व पोषक वातावरणात शिक्षण मिळावे याकरिता उर्वरित अंगणवाडीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार नाना श्यामकुळे यांनी केली आहे.
राज्य विधानसभेच्या मार्च १३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्यामकुळे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारत नसल्यामुळे भाड्याच्या खोलीत, झाडाखाली लहान मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा तातडीने अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी त्यांनी केली होती.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्र राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली चालविल्या जातात. चंद्रपूर जिल्हा परिषदेला अंगणवाडी इमारत बांधकामासाठी २०१०-११ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ११.६५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून ३३२ अंगणवाडी इमारत केंद्राचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. २०११-१२ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना, १३ वित्त आयोग, मानव विकास मिशन या योजनेंतर्गत ११.१८ कोटी रुपये निधी अंगणवाडी इमारत बांधकामाकरिता प्राप्त झाला. त्यातून ३०९ अंगणवाडी इमारत बांधकाम हाती घेण्यात आले आहे. २०१२-१३ या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून आणि १३ व्या वित्त आयोगाकडून मार्च २०१३ अखेर २.१० कोटी निधी अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाकरिता प्राप्त झाला आहे. त्यातून पंचायत समितीकडून तांत्रिक मंजुरीसह प्राप्त झालेल्या २ अंगणवाडी इमारतीची बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. उर्वरित निधी २०१३-१४ मध्ये खर्च करण्यात येईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी कळविले असल्याची माहिती आमदार श्यामकुळे यांनी दिली.