महावितरणसारख्या सरकारी कंपनीनेही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी 'फेसबुक अकाउंट'चा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच महावितरणच्या फेसबुक पेजला हजारो 'लाइक्स' मिळाले आहेत. महावितरण वीजग्राहकांशी 'फेस टू फेस' संवाद साधत आहे.
शासकीय कार्यालय किंवा संस्था म्हटल्या की तंत्रज्ञानाच्या बाबतीतील त्यांचे मागासलेपणच डोळ्यापुढे येते. मात्र, महावितरणने या सर्व संकल्पनांना छेद आता थेट फेसबुकच्या माध्यमातून वीजग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत सरकारी कंपनीही 'टेक्नोसॅव्ही' असल्याचे सिद्ध केले आहे. जगभरात संवाद साधण्यासाठी महत्त्वाच्या पंधरा सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये फेसबुक सध्या आघाडीवर आहे. नेमकी हीच बाब हेरून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजॉय मेहता यांच्याद्वारे कंपनीचे फेसबुक पेज तयार करण्याची संकल्पना पुढे आली.महावितरणने राज्यभरातील त्यांच्या विविध शहर परिमंडळात फेसबुक अकाउंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे याद्वारे कंपनीने अनेक मित्र जोडले. काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेल्या नागपूर परिमंडळातील फेसबुक अकाउंटला दोन हजारांहून अधिक मित्र मिळाले आहेत.