चंद्रपूर/प्रतिनिधी:
पावसाळयात वादळीवारा व अतिवृष्टीमुळे पोल पडून तारा तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणापासून सावधानगीरी बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळयात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही. याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठयाला आवश्यक आर्थिग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. विशेषतरू टिनपत्राच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळयात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
विजेच्या खांबाना, स्टे ला जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये. किंवा खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरावरील डिश किंवा अन्टिना वीज तारांपासून दूर ठेवावेत. ओल्या कपड्याावर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही. याची दक्षता घ्यावी.
मुसळदार पाउस आणि वादळीवारा यामुळे झाडांच्या मोठया फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकतात. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या,लोंबनाऱ्या तारांपासून सावध रहावे. त्यांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. तसेच अतिवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीज तारा, खांब रस्त्यांच्या बाजुचे फिडर पिलर, ट्रान्सफॉर्र्मसचे लोखंडी कुंपन, फ्युजबॉक्स तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळणे सहज शक्य असते.
शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी असलेल्या महावितरणच्या कॉलसेंटर्सच्या 1912, 1800-102-3435, 1800-233-3435 या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीज क्रमांकांवर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीज सेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठयात तांत्रिक बिघाड होवून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणची माहिती या टोलफ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. टोलफ्री कॉल सेंटरमध्ये वीज ग्राहकांनी रजिस्टर्ड केलेल्या कोणत्याही लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशिल सांगावा लागणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.