प्रथम आगमनानिमित्त प्रशासन व नागरिकांकडून स्वागत
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जगाला वेड लावणाऱ्या हिमगिरी एव्हरेस्टला सर करुन चंद्रपूर महाराष्ट्रासह देशात आपले नाव चिरायू करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेच्या 10 एव्हरेस्टवीरांचे आज मायभूमीत प्रथम आगमन झाले. त्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, पोलीस बँडच्या संगितमय वातावरण व फुलांचा वर्षाव करुन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम शहराच्या प्रथम नागरिक महापौर अंजली घोटेकर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आमदार नाना शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, प्रशासनाने व इतर मान्यवरांनी या सर्व मुलांचे पुष्पगुच्छे देवून स्वागत केले.
त्यांच्या या पराक्रमाचा सत्कार व कौतुक करण्यासाठी चंद्रपूरच्या सार्वजनिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि पत्रकारितेच्या जगातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. चंद्रपूर ते एव्हरेस्ट हा प्रवास यावेळी आदिवासी आश्रम शाळेच्या 10 विद्यार्थ्यांकडून ऐकतांना प्रत्येकाचा उर भरून येत होता. अनेक शाळकरी मुले देखील यावेळी उपस्थित होती. रविवारची सायंकाळ एका हृदयस्पर्शी कार्यक्रमाने चंद्रपूरकरांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली.
बोर्डा, देवाडा व जिवती येथील शासकीय आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची एक वर्षाची कठोर मेहनत, जिल्हा प्रशासनाचा व राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, आदिवासी विकास विभागाचे नियोजन या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही मोहीम फत्ते झाली. मात्र या मोहिमेचे खरे शिल्पकार ठरले ते अतिशय गरीब कुटुंबातील 10 आदिवासी विद्यार्थी. या 10 विद्यार्थ्यांचे आगमन एका विशेष बसने चंद्रपूरमध्ये सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास झाले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कवीदास काठमोडे, मनीषा धुर्वे, परमेश आडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, आकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, अक्षय आत्राम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पन्नास विद्यार्थ्यांमधून अनेक खडतर चाचण्यानंतर शेवटच्या दहा विद्यार्थ्यांना मिशन शौर्यसाठी सिद्ध करण्यात आले होते. या 10 विद्यार्थ्यांनी महिनाभरापूर्वी 8 एप्रिल रोजी चंद्रपूरात एका शानदार कार्यक्रमात निरोप आणि आशीर्वाद घेऊन कूच केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यानंतर बरोबर महिनाभरानंतर ही आदिवासी आश्रम शाळेची मुले चंद्रपूर शहरात आज आगमन करत आहेत. आज त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते. रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्या सामान्य कुटुंबातील ही मुले आदिवासी आश्रमशाळेत शिकायला गेली. शासनाच्या एका योजनेमध्ये सहभागी झाली आणि बघता बघता सेलिब्रिटी झाली. त्यांच्यासोबत फोटो काढणा-यांची आज गर्दी झाली होती. उत्सवाच्या वातावरणात आज त्यांच्या आगमनानिमित्त होते. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या विद्यार्थ्यांचे पालकांसहित स्वागत केले. राज्य शासनाने एव्हरेस्ट सर करणाऱ्या कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, विकास सोयाम, मनीषा धुर्वे या पाच विद्यार्थ्यांना 25 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच अन्य पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे. गृह खात्यामध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याबाबतही शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील आदिवासी विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि वंचित घटकांना न्याय देण्याच्या धोरणाचे आपल्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमात कौतुक केले होते. चंद्रपूरात आज आगमन झालेल्या या मुलांच्या चेहऱ्यावर त्यांनी गेल्या वर्षभर केलेल्या खडतर मेहनतीचा व प्रत्यक्ष एव्हरेस्ट चढताना आलेल्या अनुभवाचा आत्मविश्वास झळकत होता. मुंबईवरून विद्यार्थ्यांच्या या चमूसोबत प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, तसेच आदिवासी विकास विभागाचे प्रकाश तेलीवार, मडकं बंडू मडावी, राजेश भुरे, सचिन आष्टुनकर यांचा समावेश होता. चंद्रपूर शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये आमदार नाना शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थी व शहरातील गणमान्य व्यक्ती मोठया संख्येने उपस्थित होते. विश्रामगृहावरील कार्यक्रमानंतर चंद्रपूरच्या श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित प्रेस या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी चंद्रपूर ते एव्हरेस्ट या प्रवासाची माहिती दिली.