मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्याविरोधात महावितरण आक्रमक;35 जणांना कारणे दाखवा नोटीस
मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचा-यांचा घरभादे गोठविण्याच्या सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या, यासुचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशींती विदर्भातील तब्बल 81 अधिकारी आणि कर्मचा-यांचा घरभाडे गोठविण्याचे आदेश निगर्मित करण्यात आले आहे. याशिवाय यापुर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या 35 अधिकारी आणि कर्मचा-यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
मागिल काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना झाल्या असून अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या, या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याच्या स्पष्ट सुचना केल्या होत्या आणि त्यासंदर्भातील अहवाल तीन दिवसात प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगितले होते. याअनुषंगाने महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्धा मंडलातील सर्वाधिक 14 तर त्याखालोखाल नागपूर ग्रामिण, बुलढाणा आणि यवतमाळ मंडलातील प्रत्येकी 10, अकोला मंडलातील 9, अमरावती मंडलातील 8, वाशिम मंडलातील 7, गडचिरोली मंडलातील 5 तर नागपूर शहर मंडलातील 4, भंडारा मंडलातील 3 तर चंद्रपूर मंडलातील 1, अश्या एकूण 81 अधिकारी आणि कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता जून महिन्याच्या मासिक वेतनापासून गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या 81 मध्ये वेतनश्रेणी दोन मधील 9, वेतनश्रेणी तीन मधील 24 तर वेतनश्रेणी चार मधील 57 जणांचा समावेश आहे.
याशिवाय यापुर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या 35 जणांना कारणे दाखवा नोटिस बजाविण्यात आली आहे. यात नागपूर ग्रामिण मंडलातील 18, वर्धा मंडलातील 12, नागपूर शहर मंडलातील 4 तर यवतमाळ मंडलातील एका कर्मचा-याचा सहभाग असून यात वेतनश्रेणी दोन मधील3, वेतनश्रेणी तीन मधील 9 तर वेतनश्रेणी चार मधील 23 जणांचा समावेश आहे.
मागिल वर्षीही महावितरण प्रशासनाने अनेक कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता, मुख्यालयीन वास्तव्यास नसल्याच्या कारणास्त्व गोठविला होता आणि परिणामस्वरूप अनेकांनी मुख्यालयात वास्तव्यास सुरुवातही केली आहे. यावेळी हा नियम अधिक कठोरपणे राबवून प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुख्यालयी वास्तव्यास असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश भालचंद्र खंडाईत यांनी विदर्भातील पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंता यांना दिले होते, त्या अनुषंगाने सदर कार्यवाही करण्यात आली असून महावितरण कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कंपनी प्रशासन पुर्वीपासूनच आग्रही आहे आणि याबाबत सातत्त्याने पाठपुरावा करणे सुरू असतांनाही अनेक कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी येत असल्याने याबाबत सर्व संबंधितांचीही चांगलीच कानउघाडणी करण्यात येऊन कुठल्याही कर्मचा-यांची बेशिस्त खपवून घेतल्या जाणार नाही, ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे खंडाईत यांनी बजावून सांगितले आहे. वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत हयगय करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून वीजचोरीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात वीजचोरीकडे डोळेझाक करणा-यांविरोधातही कठोर कारवाईच्या सुचनाही त्यांनी दिल्या.