जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांचे बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून १५ दिवसांत दोन अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला. तर एक बिबट गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यजीवांच्या कायमस्वरुपी सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी इको-प्रो संस्थेने केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. ३१ जून रोजी मूल ते चंद्रपूरपर्यंत पायी यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वनसंरक्षक विजय शेळके यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन शेजारून जाणारा मूल-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. बांधकामाला सुरूवात झाली. दोन्ही बाजूने विस्तीर्ण घनदाट जंगल असल्याने वाघ, बिबट्यांसह तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास वाढतच आहे. सध्या या रस्त्याच्या काही भागात कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी चारपदरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या बांधकामामुळे वाहने एकाच बाजूने वळविण्यात येत आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी मालवाहू वाहने भरधाव दामटल्या जाते. अशावेळी हा मार्ग ओलांडून जाणाऱ्या वन्यजीवाचा अपघात होत आहे. वाहनांची गती आणि लख्ख दिव्यांचा प्रकाशही कारणीभूत ठरत आहे. वाहन पुढे आले तर कुठे पळावे, हे वन्यजीवांना कळत नाही़ यापूर्वी या मार्गावर वाघ, बिबट, अस्वलाचा मृत्यू झाला.
हा मार्ग ताडोबा ते दक्षिणेकडे इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व तेलंगणा वनक्षेत्राला जोडणारा वन्यप्राणी भ्रमणमार्ग आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना हा मार्ग ओलांडून पुढे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणे गरजेचे आहे. मात्र, महामार्ग निर्माण करण्याच्या प्रस्तावात 'वाइल्ड लाइफ मिटिगेशन'बाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. मागील १५ दिवसांत घडलेल्या घटनांमुळे वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त असून भविष्यात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय निर्णय घ्यावा अन्यथा भरधाव वाहनांना निष्पाप बळी पडणाºया मुक्या वन्यप्राण्यांची संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे, याकडेही इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी लक्ष वेधले.
वन्य प्राण्यांचे अधिवास आणि भ्रमणमार्ग लक्षात घेवून रस्त्याचे बांधकाम करावे, या मागणीसाठी मूल ते चंद्रपूर शहरापर्यंत 'पायदळ यात्रा काढण्यात येईल. त्यामध्ये नागरिक सहभागी होतील, अशी माहिती धोतरे यांनी दिली. या निवेदनाची प्रत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक मुकुल त्रिवेदी, विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांनाही पाठविण्यात आली आहे.