সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 09, 2018

या विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात पाण्याचे ATM

चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्रांचे लोकार्पण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावातील नागरिकाला पिण्‍यासाठी शुध्‍द पाणी मिळावे हा मी केलेला संकल्‍प आज पूर्णत्‍वास आला याचा मला आनंद आहे. चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये आज जलशुध्‍दीकरण संयंत्र अर्थात वॉटर एटीएम जनतेच्‍या सेवेत रूजु झाले आहेत. बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात वॉटर एटीएम बसविण्‍यात येतील आणि हा मतदार संघ अशा पध्‍दतीने नागरिकांना शुध्‍द पाणी देणारा देशातील एकमेव मतदार संघ ठरेल असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्‍यातील दुर्गापूर परिसरात जलशुध्‍दीकरण संयंत्राच्‍या लोकार्पण सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, वर्षभरापूर्वी जेव्‍हा मी या परिसरात आलो असता वेकोलि च्‍या कॉलनीत शुध्‍द पाणी मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्‍या होत्‍या. त्‍याचवेळी मी प्रत्‍येक गावात जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याचा संकल्‍प केला होता. पहिल्‍या टप्‍प्‍यात उर्जानगर, कोठारी, विसापूर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना मी लोकार्पित केल्‍या. मुल आणि बल्‍लारपूर तालुक्‍यासाठी अनुक्रमे ३८ व ४७ कोटी रू. खर्चुन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण करीत आहोत. त्‍यानंतर मुल तालुकयातील उथळपेठ येथे वॉटर एटीएम बसविण्‍याचा पहिला प्रयोग मी केला. तेथील सरपंचांनी मला दिलेल्‍या माहितीनुसार त्‍या गावातील ९५ जार संपुष्‍टात आले आहेत. याचा अर्थ आजार होण्‍यामागील प्रमुख कारण अशुध्‍द पाणी आहे. म्‍हणूनच या मतदार संघातील प्रत्‍येक गावात वॉटर एटीएम बसविण्‍याचा संकल्‍प मी केला, असेही ते म्‍हणाले.
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्‍यक्‍त करत ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, भेल आणि महानिर्मीती या कंपन्‍यांच्‍या सीएसआर निधीतुन चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याची विनंती मी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्‍यांनी ती तात्‍काळ मान्‍य केली. या परिसरातील उष्‍णता लक्षात घेता या जलशुध्‍दीकरण संयंत्राला चिलर बसविण्‍याची विनंती मी त्‍यांना केली. ती सुध्‍दा त्‍यांनी तात्‍काळ मान्‍य केली. आता शुध्‍द पाण्‍यासह थंड पाणी सुध्‍दा नागरिकांना प्‍यायला मिळणार आहे. ही संयंत्रे देखभाल व दुरूस्‍तीसाठी आपण महिला बचतगटांना देत आहोत. १५ हजार कुटूंबांना जार आणि कार्ड आपण देत आहोत. या पुढील टप्‍प्‍यात बल्‍लारपूर तालुक्‍यात वे.को.लि. च्‍या माध्‍यमातुन २९ ठिकाणी जलशुध्‍दीकरण संयंत्र आपण बसविणार असुन टप्‍प्‍या टप्‍प्‍याने संपूर्ण मतदार संघात प्रत्‍येक गावात हे संयंत्र बसविण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, रामू तिवारी, हनुमान काकडे, रोशनी खान, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, विलास टेंभुर्णे, वनिता आसुटकर, संजय यादव, फारूख शेख आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते उर्जानगर येथील केसरीनंदननगर, कोंडी, दुर्गापूरातील वार्ड नं. 2 आझाद चौक, वे.को.लि. कॉलनी, लख्‍मापूर या ठिकाणी जलशुध्‍दीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्‍यात आले. अन्‍य गावांमध्‍ये भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्‍या हस्‍ते ही संयंत्रे लोकार्पित करण्‍यात आली.
प्रत्‍येक गावात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. नागरिकांना पिण्‍याचे शुध्‍द व थंड पाणी मिळणार असल्‍याने नागरिकांमध्‍ये आनंद व उत्‍साह दिसुन येत होता. तशा भावना सुध्‍दा नागरिकांनी व्‍यक्‍त केल्‍या. या लोकार्पण सोहळयाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
वेकोलि दुर्गापूर कॉलनी, ऊर्जानगर, समतानगर, आयुषनगर, नेरी, दुर्गापूर वार्ड क्र. 1, भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली, वढोली, कढोली, विचोडा, मोहुर्ली, डोणी, चोरगांव, आंभोरा, वरवट, अडेगांव, चिचपल्‍ली, जांभर्ला, जुनोना, अजयपूर, टेमटा, लोहारा, घंटाचौकी, बोर्डा, वलनी, दुधाळा, पहामी, पेठ, नंदगूर, पिंपळखुट, हळदी, झरी, नागाळा (म.), गोंडसावरी, चक मरारसावरी, झोपला मारोती, मामला, वायगांव, चक निंबाळा, निंबाळा, ऊर्जानगर येथील केसरीनंदन नगर, दुर्गापूर वार्ड क्र. 2 येथील आझाद चौक, लख्‍मापूर, ऊर्जानगर परिसरातील कोंडी या ठिकाणी सदर जलशुध्‍दीकरण संयंत्रे लोकार्पित करण्‍यात आली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.