चंद्रपूर/प्रतिनिधी:
पोलिसांच्या दीमतीला असणारे बॅरिकेट्स म्हणजे दुर्जनांना रोखण्यासाठी वापरण्यात येणारे आयुध आहे. समाजातील सज्जनांची सक्रियता वाढावी आणि दुर्जनांचा वावर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करा़ पोलीस विभागाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असतो. या बॅरिकेट्स उपयोग अपघातशून्य जिल्हा बनविण्यासाठी करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले़ गुरूवारी पार पडलेल्या बॅरिकेट्स लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते़.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत उपस्थित होते. जिल्ह्यातील पोलिसांनी दारूबंदीसारख्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या विभागासाठी कुठलीही मदत करताना आनंद होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर पोलीस हे महाराष्ट्रातील सशक्त पोलीस दल म्हणून ओळखले जावे, ही आपली इच्छा असून त्यासाठी पोलिसांना लागणाऱ्या सर्व सुविधा मागणीनुसार दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले़ यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सायबर सेल सुरू करण्याचे काम चंद्रपूर पोलिसांनी केले होते.
महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात नसेल अशा पद्धतीची अत्याधुनिक व्यायामशाळा पोलिसांसाठी निर्माण करण्यात आली आहे. पोलिसांना उत्तम प्रतीचे शासकीय निवासस्थान मिळावे, यासाठी नवीन वसाहत तयार होत आहे. बल्लारपुरात नवीन पोलीस ठाणे तयार होत आहेत़ याशिवाय तुळजापूर, बाळापूर व तळोधी येथेही ठाणे तयार होत आहे. चंद्रपूरमध्ये पोलिसांना नवीन वाहने, नवीन गाड्या व पोलीस विभागातील सर्व बदल प्राधान्याने मिळावे यासाठी मंत्रालय स्तरावरही आपण प्रयत्नरत असल्याचेही ना़ मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवृत्त पोलीस कर्मचारी व वनकर्मचाºया पंतप्रधान आवास योजनेमधून घर मिळावे यासाठी तरतूद केल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. चंद्रपूर जिल्हा आता विकासाच्या वाटेवर लागला असून नवनवीन प्रयोग होत आहे. पोलिस प्रशासनानेदेखील या विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ना़ सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एव्हरेस्टच्या आॅपरेशन शौर्य मोहिमेनंतर आता जिल्ह्यामध्ये आॅपरेशन शक्ती सुरू करीत असल्याचे जाहीर त्यांनी केले. २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी जिल्ह्यातील दुर्गम भागातील सशक्त व क्रीडा निपुण विद्यार्थ्यांना आॅलिंपिकमधील निवडक खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना बॅरीकेट्सच्या छोट्या प्रतिकृती देऊन सन्मानित केले. पोलिसांनी अतिशय सशक्त व कर्तव्यदक्ष असावे, अशी अपेक्षा त्यांनी भाषणात व्यक्त केली. सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जिल्ह्यातील पोलीस दलातील विविध विभागांनी मागील वर्षभरात केलेल्या कामगीरीची माहिती सादर केली़ वाहतूक विभागानेदेखील अतिशय उत्तमपणे काम केले असून वर्षभरात एक कोटी रुपयांच्यावर महसूल गोळा केल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यामुळे तीन पद्धतीचे बॅरिकेट्स मिळाले़ याचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्या राखण्यासाठी पोलिसांना होईल, असा आशावाद व्यक्त केला .चंद्रपूर पोलिसांकडे पालकमंत्री देत असलेल्या विशेष लक्षाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.संचालन मोन्टू सिंग यांनी केले.
मिशन शौर्यप्रमाणेच मिशन शक्ती आणि मिशन सेवा
२०२४ मध्ये आॅलिंपिकच्या पद तालिकेत भारताचे वाढलेले पदक व त्यामध्ये चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पथकांची संख्या अधिक असेल. मिशन शौर्य प्रमाणेच मिशन शक्ती देखील यशस्वी होईल, अशी आशा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकल्पामध्ये नेमबाजी स्पर्धेेलाही वाव असून पोलीस दलातील जवानांनी देखील या योजनेचा लाभ घेतला पाहिजे़ मिशन शक्तीसोबतच मिशन सेवा जिल्ह्यांमध्ये सुरू होणार असून त्याद्वारे २०२० मध्ये युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील किमान पाच मुले उत्तीर्ण व्हावीत, अशी इच्छाही ना़ मुनगंटीवार यांनी जाहीर केली़ यासाठी योग्य नियोजन करीत असून संबंधित क्षेत्रात आवड असणाºयांनी तन्मयतेने पुढे यावे याकडेही त्यांनी लक्ष वेधले़