इंग्रजांचा युनियन जॅक ज्या प्रदेशावर कधीच फडकला नाही, असा भाग म्हणजे दंडकारण्यातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त भूभाग. हा गोंड राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेश म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला स्वतःचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढयातील चिमूर - आष्टीचा क्रांतीकारी उठाव सर्वानाच स्मरणात आहे. मात्र खादीच्या स्वावलंबनाचा मूलमंत्र देणारा प्रदेश म्हणूनही या जिल्हयाचे नाव इतिहासात नमूद आहे. पूर्वीच्या मध्यप्रांतातील चांदा जिल्हातील सावली येथून महात्मा गांधींनी ग्रामोव्दाराचा संकल्प भारताला दिला आहे. चंद्रपूरपासून 45 किलोमिटर पूर्वेकडे असणारे सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. या गावामध्ये 1936 मध्ये अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वेळा या गावाला भेट दिली.
आपल्या व्यस्तेत सात दिवस मुक्काम केला. त्यांनी सात दिवस या छोटया गावात मुक्काम ठेवावा असे नेमके या गावात काय असेल असा प्रश्न नेहमी पडायचा ? सावलीत यासाठी भेट दिली आणि ‘ सावली खादी चळवळीची माऊली ’ ही नवी ओळख डोळ्यापुढे आली. ग्रामोद्योगाच्या चैतन्याचे अग्नीकुंड डोळ्यापुढे आले. चरख्याचा आवाज, खादी घातलेल्यांची गर्दी आणि अहिंसा व असहकाराच्या आयुधाने जग हलवणा-या महात्मा गांधींचा संयत स्वर मनात गुंजला.
सावलीच्या नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची कुणालाही अनुभूती येईल. सावलीच्या भूमीत ठिकठिकाणी समर्पण आणि त्यागाची उदाहरण बघायला मिळाली. 82 वर्षाच्या राजाबाळ संगडीवार यांच्या थरथरत्या हाताला हाती घेत येथील इतिहास जाणता आला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयाच्या पुढ्यातच तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.
गांधीजींच्या सोबत सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉक्टर करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेतेही या काळात सावलीमध्ये मुक्कामी होते. येथील चरखा संघाच्या प्राचीन वास्तू मध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर "खेड्याकडे चला "असा नारा का दिला हे लक्षात आले. दीड-दोनशे चरख्यावर काम करणारे असंख्य हात आजही सावलीत सूत कताई करतात. सावलीच्या चरखा संघात अधिकही चरख्याची घरघर सुरू असून यावर महिला- पुरूष सूत काततात. या सुतापासून सावली मध्ये उत्तम प्रतीची खादी देखील तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. 100 वर्षांपासून सावली मध्ये सूतकताई आणि खादी तयार करण्याचे कार्य चालू आहे.
1927 पासून चरख्याची घरघर
1927 मध्ये नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने खादी भंडाराची सुरुवात झाली. पुढे 1958 पासून खादी ग्रामोद्योग कमिशन अंतर्गत नाग विदर्भ चरखा संघातंर्गत हे कार्यालय आले. 100 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हे तालुक्याचे गाव खादी परिवाराची जुळले असून या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नामवंत व्यक्तींनी या छोट्याशा गावाला भेट दिली आहे. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्माजींच्या दोन भेटीमुळेच. सावली या गावाला महात्मा गांधी यांनी दोन वेळा भेट दिली. त्यांची प्रथम भेट 14 नोव्हेंबर 1933 रोजी झाली. तर दुसरी भेट 27 फेब्रुवारी 1936 रोजी झाली. 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. थोडक्यात सात दिवस सावली ही देशाची राजकीय राजधानी झाले होते. सावली या गावांमध्ये आज असणाऱ्या चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या, अर्धवट उभ्या असलेल्या आजूबाजूच्या अनेक इमारती आपल्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा मात्र मूकपणे सांगत असतात. अडगळीत पडलेल्या जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ आणि स्वावलंबत्वाची मशाल कधीकाळी या चरख्यामध्ये पेटत होती, जाणवते.
सावलीतच चरखा संघ का ?
सावली परिसरात पूर्वापार मोठ्या प्रमाणात सूतापासून विणकर खादीचे कपडे, पासोड्या आदी तयार करीत होते. या भागात त्या काळामध्ये उत्तम प्रतीच्या धानाचे उत्पन्न व्हायचे तर वणी पासून पुढे लागणाऱ्या वऱ्हाड प्रांतात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित व्हायचा. त्यामुळे उच्च प्रतीचे तांदूळ वऱ्हाडात आणि व-हाडातला कापूस विणकरांच्या घरात, अशा पद्धतीची व्यापाराची रचना पूर्वापार होती. धानाचे पीक घेतल्यानंतर वर्षभर सूतकताईचे काम या परिसरात सुरू असायचे. तसेच या परिसरातील पद्मशाली समाज देखील लुगडे, धोतर तयार करण्याचे काम करत होते. येथील केवट समाजाने कोशाच्या किड्यांपासून कोशाच्या धाग्याची निर्मिती केली आहे. त्यापासून कोशाचे कापड, कोशाचे फेटे विणले जात होते या समाजाला को शाकारी म्हणत या समाजातील व्यापारी लोकांची भेट त्या काळातील प्रसिद्ध उद्योजक आणि महात्मा गांधींचे स्नेही जमनालाल बजाज यांच्याशी झाली. पुढे त्यांची भेट महात्मा गांधीजींची झाली. त्यावेळेस महात्मा गांधीची ग्रामस्वराज्य कल्पनेने भारलेले होते. सावली परिसरातील पूरक वातावरण बघता याठिकाणी खादी उद्योगाला बळकट करण्याचे जमनालाल बजाज यांच्या मनात आले. त्यांनी नर्मदा प्रसाद अवस्ती यांच्याकडे या भागाची जबाबदारी सोपवली. 1927 मध्ये खादी भांडार याची सावली येथे स्थापना झाली. नर्मदा प्रसाद हे या भंडाराचे चे पहिले व्यवस्थापक होय, आता बाळू पवार हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यापूर्वी जगजीवन बोरकर यांनी सुद्धा या ठिकाणी काम केले आहे.
सावली भारताच्या नकाशावर
सावली त्या काळात पूर्ण देशांमध्ये अतिशय प्रसिद्ध असेल खादी निर्माण करणारे गाव होते. खादीच्या स्वयंपूर्णतेने सावली या गावांमध्ये एकेकाळी 2700 चरख्यावर हजारोंच्या संख्येने हात सूतकताईचे काम करत होते. एव्हढेच नव्हे तर आसपासच्या जिबगाव, नांदगाव, बेंबाळ, भेंडाळा, व्याहाळ बुज, गडचिरोली या प्रमुख गावांमध्ये चरखा उपसंघ उभारण्यात आले होते. या ठिकाणावरून खादी बनवण्यासाठी सूत पुरवले जात होते... हे सारे ऐकूनच आज नवल वाटते. सावली खादी धोतर, टॉवेल, लुंगी, साड्या, कोसा धोतर, सूती पॅन्ट, कापड शुभ्र व रंगीत शर्टाचे कापड, मच्छरदाणी कापड इत्यादी ब्रांड सावलीने मध्य भारतामध्ये रुजवले होते. मुंबई पर्यंत सावली वरून तयार केलेले खादीचे कपडे विशेष करून वापरल्या जात होते. आजही या ठिकाणी सूतकताईचे काम चालते याठिकाणी हातमागाचे अद्याप अत्यंत सुद्धा आहे. गावातील अनेक महिला सध्या सूतकताईसाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या कार्यालयाला भेट दिल्यावर अनेक महिला या ठिकाणी काम करत असल्याचे दिसून आले. आजच्या काळातही परवडले इतका रोजगार सूतकताईतून दिल्या जातो. अनेक महिला फावल्या वेळात याठिकाणी न्यूज सूतकताईचे काम करतात. सावली सारख्या भागामध्ये अशा पद्धतीचे कामकाज गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असल्याचे ऐकून आनंद वाटला.
चरख्याचा शोध आणि ग्रामोद्योग
चरख्याचा शोध 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात परतले. त्यांनी कोचरब येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. या काळात त्यांनी संपूर्ण वर्षभर भारतभ्रमण केले. ग्रामीण भारताला त्यांनी या काळात जवळून बघितले. गांधीजी ईश्वरवादी होते, परंतु त्यांचा मोक्ष हा सेवेमध्ये होता. त्यांचा ईश्वरप्राप्तीचा मार्ग जनतेची सेवा होते. चालत्या बोलत्या रूपात असणाऱ्या सामान्य माणसाला ते ईश्वर मानत भारताचे स्वातंत्र्य म्हणजे त्यातल्या सात लाख खेड्यांचे स्वातंत्र्य ही त्यांची धारणा होती. त्यामुळे खेडी अर्थात गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय स्वातंत्र्याच्या नैतिक लढाईला बळ येणार नाही. याबाबत त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळेच शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या ग्रामीण जनतेला उद्योग व्यवसायासाठी दुसऱ्या एखाद्या सर्वमान्य पूरक धंद्याची आवश्यकता त्यांच्या मनात आली. या काळातच संपूर्ण भारत इंग्रजांनी तलम कपड्याची बाजारपेठ बनवली होती. दुसरीकडे स्वस्त कपडा नसल्याने लोकांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नव्हते. दारिद्र्यात खितपत पडलेल्या जनतेसाठी अशावेळी खादी सारखा पर्याय पुढे आणण्याचा गांधीजी विचार करत होते. त्यांच्या आश्रमात खादी तयार होत होती. मात्र सूत तयार होत नव्हते. अशावेळी त्यांना आठवला चरखा मात्र तोपर्यंत आपल्या गावागावातील चरखा अडगळीत पडला होता. गांधीजींनी चरख्याला जिवंत केले. बडोदा संस्थानमधील विजापूर या गावी 1915 साली गांधीजींनी अडगळीत पडलेला चरखा शोधून काढला. पुढे चरख्याने इतिहास घडवला. अडगळीत पडलेल्या चरखा बाहेर पडून थेट काँग्रेसच्या झेंड्यावर आला. सूतकताईला गांधीजींनी ग्रामीण भागातील आर्थिक स्वातंत्र्याचा दर्जा दिला. घराघरात चरखा फिरायला लागला. खादी घालेल तोच काँग्रेसचा कार्यकर्ता असा दंडक त्यांनी प्रसंगी घातला. महात्मा गांधींचे वलय त्यांच्या शब्दाला असणारा मान यामुळे संपूर्ण ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खादीची चळवळ सुरू झाली. देश कापडाच्या दृष्टीने स्वावलंबी झाला. एका महात्म्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक स्वावलंबिता व व संपन्नतेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे देशातील हजारो खेडी कोणत्याही संपर्क व्यवस्थेशिवाय गांधीजींच्या पाठीशी उभी राहिली. सावली सारख्या चंद्रपूर जिल्हयातील छोटयाशा गावाने चरख्याच्या अग्नीकुंडातून देशाच्या स्वातंत्र्य लढयाला, ग्रामोध्दाराला अशी चालना दिली.
प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी
चंद्रपूर-9702858777