वसुलीपथकावर हल्याचे सत्र सुरूच
नागपूर/प्रतिनिधी:वर्धा आणि भंडारा येथील महावितरणच्या वसुली पथकावर हल्ला करण्याची घटना ताजी असतांनाच सोमवारी सकाळी नागपूर येथे
थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या जनमित्रावर हुडकेश्वरमध्ये हल्ला करण्यात आला. सोमवारी सकाळी ११वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महावितरणच्या हुडकेश्वर शाखा कार्यालयात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ रामा सोनवणे हे थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी घेऊन ताजेश्वर नगर येथील आशिष तळवेकर यांच्या घरी गेले. तळवेकर यांनी जुलै २०१८ पासून देयक भरले नव्हते. सोनवणे यांनी पैसे भरल्याची पावती मागीतली असता तळवेकर याने सोनवणे यांच्यावर हल्ला केला.यात सोनवणे जखमी झाले. घटनेची माहिती मिळतात शाखा अभियंता राजेश आकरे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठले. गेल्या १५ दिवसात विदर्भातील वर्धा,भंडारा अकोला,आणि नागपूर येथे महावितरणच्या वसुली पथकावर हल्ला करण्यात आला.यात वर्ध्यातील कर्मचाऱ्यावर चक्क ब्लेड ने गड्यावर वार केला गेला.तर महिला जनमित्राला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.या घटनेची रितसर तक्रार करण्यात आली आहे.पोलिसांनी भादवि कलम ३३२,३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपच्या कठोर शिक्षेसाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.