नागपूर, ३ ऑक्टोबर २०१८
पूर आणि सातत्याने कोसळणा-या पावसाच्या विध्वंसक आणि दीर्घकाळ चाललेल्या आपत्तीतून बाहेर येत केरळ अधिक कणखर झाले आहे. नुकत्याच झालेल्या केरळ ट्रॅव्हल मार्ट या भारतातील सर्वांत मोठ्या व सर्वाधिक प्रतिक्षित खरेदीदार-विक्रेते संमेलनामध्ये केरळने ७३ देशांतील १५०० खरेदीदारांचे यजमानपद भूषवले. पर्यटन क्षेत्रातील कंपन्या आणि केरळ सरकारच्या पर्यटन खात्याने संयुक्तपणे आयोजित केलेला हा सोहळा देशातील सर्वाधिक यशस्वी सोहळ्यांपैकी एक ठरला. केरळमधील संपन्न पर्यटन उद्योग आपत्तीमुळे काही काळ अनागोंदीच्या अवस्थेत होता. मात्र, केवळ दोन आठवड्यांत रस्ते दुरुस्त करण्यात आले, विमानतळ पुन्हा कार्यान्वित झाले आणि जगभरातील पर्यटक आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी राज्य दोन्ही हात पसरून आतिथ्याने उभे राहिले. राज्यातील बहुतेक नवीन उपक्रम आणि पर्यटन उत्पादनांची नव्याने विकसित करण्यात आलेली मालिका नागपूर येथे ३ ऑक्टोबर, २०१८ रोजी सर्वांसमोर मांडण्यात आली.
“केरळ पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आहे आणि राज्यातील पर्यटन उद्योग पुन्हा उसळी घेऊन नव्या जोमाने कार्यरत झाला आहे, याची हमी केटीएमच्या यशामुळे मिळते. एवढ्या भीषण आपत्तीतून एवढ्या लवकर बाहेर येणे ही बाब उद्योगाचा कणखरपणा दाखवणारी आहे. आम्ही पूर्वपदावर आलो आहोत आणि जगभरातील पर्यटकांच्या स्वागतास सज्ज आहोत हे जगाला सांगण्याचे काम आता सर्वांत महत्त्वाचे आहे,” असे केरळचे माननीय पर्यटनमंत्री श्री. कडकमपल्ली सुरेंद्रन म्हणाले.
सरकारने घेतलेल्या ‘पर्यटन सज्जता सर्वेक्षणात’ प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक पर्यटनस्थळाची तपशीलवार पाहणी करून विश्लेषण करण्यात आले. काही मोजक्या रिसॉर्ट्सचा अपवाद वगळता पर्यटन उद्योग पूर्वपदावर आला आहे, असा निष्कर्ष यातून निघाला. हंगामातील पहिले खासगी विमान ऑस्ट्रेलियाहून ६० पर्यटकांना घेऊन १५ सप्टेंबर रोजी कोचीत आले. त्याचप्रमाणे राज्याच्या पर्यटन उद्योगातील सर्व उपक्रम पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार आहेत, हे केरळ ट्रॅव्हल मार्टशिवाय (केटीएम) कोची मुझिरिस बिनालेसारखे सोहळे आणि अनेकविध व्यापार मेळाव्यांतून जगाला सांगण्यात येत आहे.
“ब्रॅण्डला नवीन चेहरा देण्यासाठी तसेच देवाच्या लाडक्या भूमीवर पुरामुळे आलेली दु:खाची छाया पुसून टाकण्यासाठी गेल्या दोन महिन्यात अनेक नवीन आणि रोचक उत्पादने सर्वांसमोर आली आहेत. यामध्ये जटायू अर्थ सेंटरचा समावेश आहे. हे ६५ एकर जागेत पसरलेले अनोखे तसेच पर्यावरणपूरक साहसविश्व आहे. पर्यटन सज्जतेचा आराखडा लक्षात घेता, केरळमधील पर्यटन उद्योग पूर्ववत कामाला लागला आहे हे जगाला सांगण्यासाठी आम्ही एक कालबद्ध कृतीयोजना आखली आहे. पर्यटन लेखक, पत्रकार, मीटिंग प्लानर्स आणि ट्रॅव्हल एजंट्ससाठी अनेक एफएएम दौरे आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. याशिवाय केरळचा प्रसार जगभरात करण्यासाठी नवीन ब्रॅण्ड अभियान राबवले जाणार आहे,'' असे केरळ सरकारच्या पर्यटन सचिव आयएएस राणी जॉर्ज म्हणाल्या.
देशांतर्गत पर्यटकांसाठी व्यक्तीनुरूप विकसित केलेली नवीन उत्पादने आणि अनुभव
ब्रॅण्ड न्यू पर्यटन धोरण
नव्याने स्थापन झालेल्या रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन आणि कुमारकोमला लंडन वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये प्रतिष्ठेचा जबाबदार पर्यटन पुरस्कार मिळाला हे बघता नवीन पर्यटन धोरणाचा भर शाश्वत पर्यटन उपक्रमांवर आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पर्यावरण-पूरक, जबाबदार पर्यटन हा या धोरणाचा पाया आहे. कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी ग्रीन फार्म धोरणाचा अवलंब केला जाणार आहे. याचा भर वृक्षारोपण आणि शेतांवर असेल. कारागिर, पारंपरिक हस्तकलाकार यांच्यावर विशेष लक्ष देऊन कृषी, पारंपरिक व्यवसाय आणि कलाप्रकारांवर आधारित छोट्या प्रमाणावरील म्युझियम्स तयार केली जाणार आहेत.
१२ वर्षांतून एकदा दिसणारा चमत्कार
साहसाची आवड असलेल्यांसाठी ट्रेकिंग, सायकलिंग, बाइक रायडिंग आदी मार्गांनी मुन्नारच्या टेकड्यांवरील चढ-उताराच्या वाटा धुंडाळण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. त्यातच १२ वर्षांतून केवळ एकदा फुलणारे नीलकुरिंजी नावाचे जांभळ्या रंगाचे दुर्मीळ फूलही यंदा फुलणार आहे.
अशा प्रकारची एकमेव बोट रेस लीग
चॅम्पियन्स बोट लीग हा कदाचित यंदाचा सर्वांत प्रतिक्षित कार्यक्रम होता. ही लीग ११ ऑगस्ट रोजी पुन्नामदा सरोवरात सुरू होणार होती. चॅम्पियन्स बोट लीग या वर्षाच्या अखेरच्या भागात घेऊन केरळचे पाणी आजही साहसी उपक्रमांसाठी सुरक्षित आहे, याची ग्वाही पर्यटकांना देण्याचा सरकारचा विचार आहे. स्नेक बोट शर्यतींना दिले जाणारे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने घेतला जाणारा हा उपक्रम एक रोमांचक, जागतिक दर्जाचे पर्यटन उत्पादन म्हणून विकसित होणार हे नक्की.
जगातील सर्वांत मोठे पक्षीशिल्प
शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे आणखी एक उदाहरण म्हणजे गेल्या महिन्याच्या सुरुवातीला उद्घाटन झालेले ६५ एकर जागेत पसरलेले जटायू अर्थ सेंटर. यातील जटायूचा पुतळा २०० फूट लांब, १५० फूट रुंद आणि ७० फूट उंचीचा आहे. हे जगातील सर्वांत मोठे कार्यान्वित पक्षीशिल्प आहे. दक्षिण केरळमधील मध्यवर्ती पर्यटनस्थळांजवळ हे स्थळ असल्याने तेथे पोहोचणे सुलभ आहे.
भारतातील पहिले जैवविविधता म्युझियम
गेल्या काही महिन्यात राज्याने अभिमान वाटावे असे अनेक पर्यावरणाची माहिती देणारी आणि इको-फ्रेण्डली उपक्रम सुरू केले आहेत. तिरुअनंतपूरमच्या बाह्यभागात (आऊटस्कर्ट्स) भारतातील पहिले जैवविविधता म्युझियम आकारास आले आहे. एकेकाळी बोटहाउस असलेले हे म्युझियम राज्यातील पहिल्या सायन्स ऑन स्फीअर (एसओएस) प्रणालीने युक्त आहे.
गेटवे टू मलबार
एका बाजूने समुद्र तर दुस-या बाजूने पश्चिम घाटाने वेढलेले मलबार म्हणजे खमंग मोपला खाद्यसंस्कृतीचे माहेरघर. कन्नुरचे आगामी ग्रीनफील्ड विमानतळ सुरू झाल्यानंतर, कुर्ग, कोइंबतूर आणि म्हैसूर यांच्या सीमांना लागून असलेल्या मलबारला केरळमधील पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हणून प्रस्थापित करण्याचा केरळ टुरिझमचा मानस आहे.
आठवणींच्या प्रदेशात एक फेरफटका
कलेबद्दल विशेष जिव्हाळा असलेल्यांसाठी हे वर्ष आणणार आहे. अमाप लोकप्रियता लाभलेल्या कोची मुझिरिस बिनालेची आणखी एक आवृत्ती. फोर्ट कोचीमधील स्वप्नाळू रस्ते यानिमित्ताने सर्वांसमोर येतात आणि भारतातील समकालीन कलेचे चित्र पालटून टाकणा-या व कोचीला भारताची कला राजधानीचा दर्जा देणा-या या बिनालेला कलाप्रेमींनी भेट द्यावी यासाठी राज्य सरकार विशेष उत्तेजन देते. कोची मुझिरिस बिनाले १२ डिसेंबर २०१८ रोजी सुरू होत असून, ते मार्च २०१९ पर्यंत चालणार आहे.
ऐतिहासिक स्थळांच्या माध्यमातून प्रवास
स्वत:ला दुस-या युगात घेऊन जाण्यासाठी उत्सुक असलेल्या इतिहासप्रेमींसाठी मुझिरिस हेरिटेज प्रोजेक्ट आहे. इसवीसनाच्या पहिल्या शतकात अरब, रोमन, इजिप्शियन व्यापा-यांचा राबता असलेल्या या संपन्न बेटाचे अवशेष २५ म्युझियम्समधून जतन करण्यात आले आहेत. हा भारतातील वारसा संवर्धनाचा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. इतिहासाच्या क्षेत्रातील आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे स्पाइस रूट प्रोजेक्ट. २००० वर्षांपूर्वीचे प्राचीन समुद्री मार्ग आणि त्यांच्या माध्यमातून ३० देशांसोबत होत असलेल्या सांस्कृतिक व खाद्यसंस्कृतीविषयक आदानप्रदानावर हा प्रकल्प प्रकाश टाकतो.
“पर्यटक समृद्ध करणा-या अनुभवाच्या शोधात येतात आणि महोत्सव, म्युझियम्स, प्रदर्शने यांच्या माध्यमातून केरळचा एक संपूर्ण अनुभव घेण्यात आम्ही त्यांना मदत करतो. यावर्षी वर्षाच्या दुस-या सहामाहीत कोची मुझिरिस बिनाले आयोजित करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कलाविश्वाच्या प्रकाशझोतात केरळ पुन्हा एकदा येणार आहे. यावर्षी जुलै महिन्यात आम्ही वर्षाऋतू साजरा करणा-या निशागंधी मान्सून संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेधणारी व्यासपीठे तयार करण्यासाठी अशी कल्पक पावले यापुढेही उचलली जातील. आम्ही जागतिक साहित्य महोत्सव आणि संगीत महोत्सवाचे नियोजन करण्याच्या प्रक्रियेत आहोत. हे महोत्सव सार्वजनिक संस्थांच्या मदतीने आयोजित केले जातील," असेही श्रीमती राणी जॉर्ज म्हणाल्या.
२०१७ हे वर्ष केरळ टुरिझमसाठी देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही पर्यटकांच्या संख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढून १,४६,७३,५२० झाली. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत ११.३९ टक्के वाढ झाली. तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत २०१७मध्ये गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत ५.१५ टक्के वाढ होऊन ती १०,९१,८७० झाली.
कोंडे नॅस्ट ट्रॅव्हलर (सर्वोत्तम लीझर डेस्टिनेशन), नॅट जिओ ट्रॅव्हलर आदी नियतकालिके केरळमधील पर्यटनाची वारंवार प्रशंसा करत असतातच. याशिवाय, लोन्ली प्लॅनेट मॅगझिन इंडियाने २०१८ सालातील भारतातील कौटुंबिक पर्यटनासाठीचे सर्वोत्तम स्थळ म्हणून केरळची निवड केली आहे. नवी दिल्ली येथे २७ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळ्यात २०१६-१७ या वर्षासाठी केरळ टुरिझमला चार पुरस्कार प्राप्त झाले.
देशांतर्गत बाजारपेठेत सर्वत्र पोहोचण्यासाठी पार्टनरशिप बैठकींची एक मोठी मालिका घेण्यात आली. यामध्ये भुवनेश्वर, विजयवाडा, अहमदाबाद, बडोदा, सुरत, लखनौ आणि इंदूर येथे जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान बैठका घेण्यात आल्या. अशाच प्रकारच्या बैठका पुणे आणि मुंबई येथे येत्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत.
केरळच्या पारंपरिक कलाप्रकारांची सांस्कृतिक मेजवानी आणि त्यांची आकर्षक पर्यटन उत्पादने यांचा संयोग साधणा-या या पार्टनरशिप बैठकांमध्ये संबंधित शहरांतील पर्यटन व्यावसायिकांना केरळमधील ४०हून अधिक कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते. यामध्ये ३० मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रमाशी निगडित सादरीकरण दिले जाते. यात केरळमधील विविध कलाप्रकारांची माहिती दिली जाते तसेच केरळमधील ग्रामीण जीवन आणि लोककला सर्वांसमोर आणल्या जातात.
अधिक तपशील केरळ टुरिझमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत- www.keralatourism.org किंवा पुढील मेल-आयडीवर आमच्याशी संपर्क साधा- contact@keralatourismmarketing.org