संग्रहित |
मुंबई/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे हे उपक्रम वाढीस लागले आहेत. शेतकऱ्यांना पशुधनाचा फायदा घेता यावा यासाठी जालना जिल्ह्यात राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. देशभरातील मान्यताप्राप्त विविध जातिवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, घोडे, वराह तसेच जातिवंत कुक्कुट पक्षी यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. पशुपालकांमध्ये पशुपालनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागचा उद्देश असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी जवळपास 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पशुपालकांत पशुपालनाची आवड निर्माण व्हावी, यासह देशी/ संकरित पशुधनाचे जतन व संवर्धन करणे, तसेच पशुधनाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन घेतले जाणार आहे. जालन्यात जवळपास 150 एकर जागेवर हे प्रदर्शन होणार असून, या प्रदर्शनामध्ये सेल्फ साफिसिएंट गावाचा सेटअप उभारला जाणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक गोपालन, म्हैसपालन, शेळी- मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन आदी गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात इतर राज्यांचा सक्रिय सहभाग असेल. सोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 100 पशुपालकांचा सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट पशुधनास रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.