उस्मानाबाद/प्रतिनिधी:
कुक्कटपालन व्यवसायात सातत्याने हो
रा तोटा, पावसाअभावी नापिकी, कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून शिराढोण (जि. उस्मानाबाद) येथील एका शेतकऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आला.येथील शेतकरी रामभाऊ गुलाबराव यादव (वय 55) हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी सीताबाई यादव (वय 50) या मदत करतात. यादव कुटुंबाकडे शेतीसाठी व कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. हे पती- पत्नी शेतातस वास्तव्यास असतात. गेल्या तीन ते चार वर्षात पावसाअभावी नापिकीमुळे उत्पन्नात घट आली आणि कुक्कुटपालन व्यवसायत सातत्याने नुकसान व तोटा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे पती- पत्नी तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे रामभाऊ यादव यांनी मध्यरात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला व त्यानंतर स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, पोलिस उपनिरीक्षक महेश कांबळे, पोलिस नाईक बाबासाहेब मोराळे, अमोल उंबरे, दयानंद गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.