थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या वर्धा येथील तंत्रज्ञ दिपक जथरे यांचेवर प्राणघातक हल्ला करुन जखमी करण्यात आले होते. बुधवारी झालेल्या या हल्ल्यात जथरे यांच्या गालावर हल्लेखोरांनी ब्लेडने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. आज (शनिवार दि.29) महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी जथरे यांची वर्धा येथील निवासस्थानी भेट घेऊन आस्थेने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना धीर दिला.
हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी महावितरण प्रशासनाकडून सर्व मदत देण्याची ग्वाही यावेळी प्रादेशिक संचालक खंडाईत यांनी दिली तसेच प्रशासनाकडून वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी वर्धा मंडल कार्यालयाचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे, कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, संजय वाकडे आदी उपस्थित होते.
महिला तंत्रज्ञाचे कौतुक
मागील आठवड्यात वर्धा शहरात थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करतेवेळी महिला तंत्रज्ञ मधू शिव यांना एका ग्राहकाने अश्लिल शिवीगाळ केली, मात्र त्यास अजिबात भीक न घालता शिव यांनी थेट पोलीस ठाणे गाठून त्या उपद्रवी ग्राहकाविरोधात तक्रार दाखल केली, एवढ्यावरच न थांबता आरोपीला अटक होईस्तोवर शिव यांनी सातत्याने पाठपुरावा केला, यामुळे पोलिसांनी सदर ग्राहकास अटक केली असून अद्यापही सदर ग्राहक अटकेत आहे, शिव यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी त्यांची भेट घेत त्यांची प्रशंसा केली. काही ग्राहक वीज बिलाचा नियमित भरणा करण्यास टाळाटाळ करून उलटपक्षी महावितरण कर्मचाऱ्याला दमदाटी आणि प्रसंगी मारहाण करतात अश्या वेळी त्यांना घाबरून न जाता आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पडणाऱ्या मधू शिव आणि त्यांच्यासारख्या कर्मचाऱयांच्या पाठीशी महावितरण प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही खंडाईत यांनी यावेळी दिली.