चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली. हुतात्मा स्मारकाचे स्वरूप बदलण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.
महानगरपालिकेमार्फत संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू आहे. तथापि, केवळ संरक्षण भिंत व डागडुजी न करता या संपूर्ण परिसराचा विकास करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे दीर्घकाळ टिकणारे छायाचित्र संरक्षक भिंतीवर उमटतील अशा पद्धतीचे नियोजन करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या परिसरामध्ये लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा सुविधा उपलब्ध करण्याचेही त्यांनी सुचविले. लहान मुलांसाठी एकीकडे प्लेगार्ड करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष निर्माण करण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी या परिसरात जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा स्मारक असल्यामुळे दुपारच्या वेळेस या ठिकाणी तरुण मुला-मुलींना अभ्यास करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करण्यात यावी अशी सूचना देखील त्यांनी केली. मुलांना या ठिकाणी इतिहासाचे दर्शन होतानाच करिअर करण्याची संधी उपलब्ध होईल अशी बैठक व्यवस्था ही करण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.