ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळावी यासाठी महावितरणकडून सातत्याने विविध नवनवीन उपाययोजना करण्यात येतात. तसेच महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कार्यादेश प्रक्रियेतही पारदर्शकता आणि गतिमानता राहावी म्हणून ही सर्व प्रक्रिया ईआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे प्रक्रिया पूर्ण न केल्यास कुठल्याही देयकाची अदायगी करु नये असे स्पष्ट आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
महावितरणच्यावतीने विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार ईआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येतात. याबाबत महावितरणने 31 मार्च 2018 ला परिपत्रकही जारी केले आहे. त्यानुसार कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) ईआरपी प्रणालीच्या माध्यमातूनच निर्मित करुन द्यावयाची असून या कार्यादेशात पीओ (पर्चेस ऑर्डर) क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. या क्रमांकाचा उल्लेख नसल्यास देयकाला मंजूरी मिळणार नाही. तसेच संबंधित कंत्राटदाराला कामाच्या देयकाची अदायगीही मिळणार नाही. याबाबतची सूचना कंत्राटदारांना पत्राद्वारे देण्यात आलेली आहे.
या प्रणालीमुळे महावितरणच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता आली असून कंत्राटदारांना त्यांची देयके निश्चित कालावधीत मिळत असल्याने विविध विकास कामांना अधिक गती मिळाली आहे.