चंद्रपूर/ललित लांजेवार:
आज परियंत तुम्ही एटीएम मशीनमध्ये एटीएमच्या सहाय्याने गंडा घालण्याचे प्रकार बघितले असाल,एटीएम फोडणारी टोळी बघितली असाल,बनावट एटीएमच्या आधारे एटीएम मधून पैसे चोरणारे बघितले असाल, सीसीटीव्ही फोडून चोरी करतांना बघितली असाल मात्र चंद्रपुरात अख्खी एटीएम मशीनच चोरी करण्याचा प्रकार समोर आलं आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील मराठा चौक येथील टाटा इंडीकॅश बँकेचा हा ATM होता.सोमवारच्या पहातटे चार चोरट्यांनी संधी साधत ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे न निघाल्याने चोरट्यांनी चक्क ATM मशीनच चोरण्याचा प्रयत्न केला,मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न जागीच फसला,मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून ATM मध्ये जवळपास २ लाख रुपये कॅश असल्याचा अंदाज आहे. हॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अँड फ्युरियस चित्रपटात अश्या प्रकार दाखविण्यात आला आहे.
कचऱ्याच्या ठेल्यावरून होणार होती ATM मशीनची ट्रान्सपोर्टिंग
चोरट्यांनी ATM केंद्राबाहेर चंद्रपूर शहर मनपाच्या कचरा जमा करणाऱ्या तीनचाकी हात गाडीचा आधार घेत मशीन चोरी करून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा हा प्रयत्न होता, हा मशीन ट्रान्सपोर्टटिंगचा प्रयत्न सुरु असतानाच चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.हि मशीन ATM केंद्राबाहेर काढून तशीच बऱ्याच वेळ ठेवण्यात आली होती.त्यानंतर तिला तपासणीसाठी नेण्यात आले.या संपूर्ण घटनेचा तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार
एस.एस भगत करीत आहेत.
ATM बाहेर सुरक्षा रक्षक नाही
२४ तास सुरक्षा रक्षक, आपत्कालीन परिस्थितीतले अलार्म, आत आणि बाहेरही सीसीटीव्हीचे जाळे एटीएम सुरक्षेसाठी असे काटेकोर उपाय बंधनकारक करण्यात आली असतानाही, अनेक बँकांनी व ATM एजेन्सीजनी सरकारचे हे आदेश धाब्यावर बसविलेले आहेत.
शहरातील जवळजवळ निम्म्या एटीएम केंद्रांची सुरक्षा सध्या वाऱ्यावरच आहे. तिथे साधे सुरक्षारक्षकही नाहीत, शस्त्रधारी रक्षक तर दूरचीच गोष्ट. त्याचबरोबर या केंद्रांच्या काचासुद्धा पारदर्शक नाहीत. त्यामुळे ही केंद्रं असलेल्या बँकांनी सुरक्षेबाबतच्या सूचनांना केराची टोपली दाखवली असल्याचेच चित्र आहे.
रविवारी घडलेल्या या चोरीच्या घटनेत देखील ATM मशीन ज्या केंद्रात आहे त्या केंद्राबाहेर सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर आले आहे,
एकीकडे चोरीच्या घटना वाढत असताना दुसरीकडून बँकांकडून एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अनेक एटीएमजवळ कमालीची अस्वच्छता दिसून आली़ अनेक वेळा एटीएममधून पैसे काढताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात़ त्यामुळे साहजिकच सुरक्षा रक्षकावर ती अडचण सोडविण्याची जबाबदारी असत़े परंतु सुरक्षा रक्षकच हजर नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असत़े.
असे आहेत खबरदारीचे नियम
१) दरवाजासमोरील आणि एटीएममधील भाग दिसतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
२) एटीएमचा दर्शनी भाग काचेने बंद व पारदर्शक असावा. दरवाजाबाहेर व आत भरपूर प्रकाश व्यवस्था असावी.
३) एटीएमचे शटर हॅन्डलने हळुवार उघडणारे असावे. ते उघडल्यानंतर वरच्या भागात लॉक करण्याची व्यवस्था असावी.
४) एटीएममध्ये जाणाऱ्या ग्राहकाला दरवाजा आतमधून लॉक करता यावा किंवा विशिष्ट प्रकारचे कार्ड स्वाईप केल्याशिवाय आत जाता येणार नाही, अशी व्यवस्था असावी.
५)सुरक्षारक्षकाने एटीएम सेंटरच्या बाहेर कोणतेही वाहन किंवा संशयित व्यक्तीला रेंगाळू देऊ नये.
६) एटीएममध्ये एका वेळी एकच व्यक्ती उपस्थित राहील, हे सुरक्षारक्षकाने कटाक्षाने पाहावे. एटीएममध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू लावण्यापूर्वी सुरक्षारक्षकाने ती व्यक्ती अधिकृत व योग्य उपकरण लावत आहे, याची खात्री करावी.
७) एटीएम मशिन उचलून बाहेर नेता येणार नाही, असे बसविण्यात यावे.
८) एटीएमच्या आतमध्ये दोन ठिकाणी धोक्याचे संदेश देता येऊ शकेल, असे सायरनचे बटन असावे.
९) सुरक्षारक्षकाकडे आणीबाणीच्या वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, हद्दीतील पोलीस ठाणे, संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चौकी यांचे फोन क्रमांक उपलब्ध करून द्यावेत.