राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या पर्यावरण संरक्षणासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील वर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने अपेक्षित उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावली. मात्र आपले शहर हे जगातील सर्वात उष्ण हवामानाचे शहर असल्याने पर्यावरणाप्रती आपली जवाबदारीही दुप्पट आहे. चंद्रपूरची जनता आम्हाला साथ देईल, शासनाच्या वृक्षलागवडीत पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करीत प्रत्येकाने किमान एका तरी झाडाचे पालकत्व घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.तर वृक्षलागवड संदर्भात माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, मनपातर्फे शासनाने ६० हजार झाडे लावावे, असे आवाहन दिले आहे. मात्र मनपाने ९७ हजार झाडांचे नियोजन केले आहे. शहरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून कुंपणावर विशेष लक्ष देण्यात ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना विवाह, जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देताना रोपटे देण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी १०० टक्के झाडे जगविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त सचिन पाटील, शीतल वाकडे, बारई, हजारे, इको प्रो संस्था, रेडक्रॉस सोसायटी, रोटरी क्लब, विश्व मानव केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.