पेट्रोल व डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या मागण्या, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आदी प्रकरणी तात्काळ योग्य निर्णय घेण्याच्या मागण्यांसाठी शनिवारी राकाँच्यावतीने कानगाव येथे वर्धा- राळेगाव-घाटंजी या राज्य मार्गावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी केले.
चार वर्षांच्या लेखाजोगा जनतेसमोर उघडे करीत अच्छे दिन आलेच नाही केवळ लोकांना खोटी आश्वासने आणि घोषणा सरकारने केल्या. केवळ रस्ते म्हणजे विकास नव्हे तर सर्वसमान्यांसाठी विविध योजना असतात. त्या योजनांची चार वर्ष होवूनही अंमलबजावणी झाली नाही. आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा पासून आजही जनता वंचित आहे; पण केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांची या ना त्या कारणाने शुद्ध फसवणूक करीत आहे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी सांगितले.
माजी आमदार राजू तिमांडे म्हणाले की, हे सरकार केवळ उद्योजकांच्या हिताचे आहे. सर्वसामान्य जनतेशी काही त्याला घेणे-देणे नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठाले आश्वासने भाजपाच्या पुढाऱ्यांनी दिली होती. परंतु, अनेक आश्वासने केवळ आश्वासने राहून ती हवेत विरली आहेत. यामुळे बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर यांच्यात केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी १ कोटी नोकऱ्या दिल्या जाईल असे आश्वासन युवकांना देत युवकांची मते आपल्या झोळीत पाडून घेण्यात आली. मात्र, सध्या बेरोजगार वणवण फिरत आहेत. त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही. यामुळे युवकांमध्ये त्यांच्यात निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी अॅड. सुधीर कोठारी व किशोर माथनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांनी पेट्रोल व डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या मागण्या, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आदी प्रकरणी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य पावले उचलावित अशी मागणी केली.
बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात घट झाली. त्याचे नुकसान अद्याप अनेकांना मिळाले नाही. शिवाय अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदलाही नुकसानग्रस्तांना देण्यात आला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनात सुनील राऊत, नितीन देशमुख, धनराज तेलंग, संदीप किटे, हरीष वडतकर, नितीन देशमुख, धनराज तेलंग, नामदेव तळवेकर, रमेश कामनापुरे, मधुकर झाडे, समीर शेख, संजय काकडे, नरेंद्र थोरात, रमेश जगताप यांच्यासह राकाँच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
महावितरणच्यावतीने शेतकरी विरोधी धोरणांचा गत काही वर्षांपासून अवलंब केल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी कार्यालयात धुळखात पडून असून त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्याची मागणी करीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.
धोत्रा चौरस्त्यावर रास्ता रोको
अल्लीपूर - शेतकरी संपाला पाठिंबा देत काँग्रेसच्या हिंगणघाट तालुका अध्यक्ष बालू महाजन यांच्या नेतृत्त्वात धोत्रा चौरस्ता परिसरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे सदर मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती. आंदोलनात उत्तम ढगे, रामदास काटकर, राजेंद्र आंबटकर, सुदाम घोडे, रविंद्र वाणी, विठ्ठल साळवे, चंदु चौधरी, धनराज घुसे,सचिन कामडी, अकबर पठाण, महादेव रेंघे, संजय गांवडे, माणिक कलोडे, मारोतराव लाजोरकर, रामु धनविज, रत्नाकर वैद्य आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून संपुर्ण कर्जमाफीसह विविध मागण्या रेटण्यात आल्या.