मनपा-ग्रीन व्हिजीलद्वारे कार्यशाळा
नागपूर/प्रतिनिधी:
पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या व्यतिरिक्त दैनंदिन उपयोगातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करणे आजपासून आम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्य बंद करू. यासाठी जनजागृतीचा वसा आजपासून स्वीकारू, असा संकल्प मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एकमुखाने केला.
निमित्त होते नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित कार्यशाळेचे. ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात’ हा कार्यशाळेचा विषय होता. मनपा शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक सहभागी असलेल्या या कार्यशाळेत ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून आणि मूक अभियनातून प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना बोलते केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी मूकनाट्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होणाऱ्या कृती करून दाखविल्या. त्या कृती काय हे ओळखून विद्यार्थ्यांनी योग्य काय, ते अभिनयाच्या माध्यमातून करून दाखविले.
सदर कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, मनपातील भाजपच्या प्रतोद नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेविका श्रद्धा पाठक, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटजी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, काही गोष्टींवर कायदेशीर बंदी आणणे आणि स्वयंसंकल्पाने काही गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर करणे, यात बरेच अंतर आहे. ज्या गोष्टी पर्यावरण रक्षणात सहयोगी आहे अशा गोष्टींची सुरुवात मनपाने कायद्याची वाट न पाहता सुरू केली. नदी स्वच्छता अभियान, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, इथेनॉलवर बसचे संचलन आदी विधायक गोष्टींची सुरुवात केली आणि नागरिकांनीही त्याला तितकाच प्रतिसाद दिला. कुठलेही चांगले विचार रुजविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका मोठी असते. आपण स्वत:पासून प्लास्टिकबंदी सुरू केली तर आपण या चळवळीतील क्रांतिकारी बनाल, असेही ते म्हणाले.
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे असते. मनपाच्या शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर मूल्यशिक्षणही देते, हे अशा उपक्रमांतून सिद्ध होते. प्लास्टिकबंदी, वृक्षारोपण, नैसर्गिक स्त्रोत आदींचे जतन करणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने ओळखायला हवी.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकबंदी करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करू, अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मधु पराड यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाचे कर्मचारी वृंद आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, विकास यादव, अभय पौनीकर, कार्तिकी कावळे, अमोल भलम, शांतनू शेळके, आयुष शेळके, दादाराव मोहोड आदींनी सहकार्य केले.
चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये साधला नागरिकांशी संवाद
पर्यावरण दिवसाच्या निमित्तान नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी सायंकाळी धरमपेठ परिसरातील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. ‘प्लास्टिकचे दुष्परिणाम’ या विषयांवर स्वयंसेवकांनी नागरिकांची मते जाणून घेतली. प्लास्टिकबंदीसाठी काय करायला हवे यासंदर्भात नागरिकांच्या सूचना नोंदवून घेतल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ३५० नागरिकांशी संवाद साधण्यात आला. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्वत:पासून प्लास्टिकबंदी करण्याचा संकल्प केला.