नागपूर/प्रतिनिधी:
पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरीत दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांचेशी सौजन्यपुर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत समजावून सांगण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. नागपूर परिक्षेत्रातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदीया आणि नागपूर या पाचही परिमंडलाच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही
परिमंडलांच्या संयुक्त आढावा बैठकीला मार्गदर्शन करतंना प्रादेशिक संचालक
भालचंद्र खंडाईत, सोबत इतर अधिकारी.
|
अनियमितपणे वीजबिल भरणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ प्रभावाने खंडित करण्याच्या स्पष्ट सुचना करतांनाच आपली जवाबदारी योग्यरित्या पार न पाडणा-या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसेस बजावून त्यांची बदली इतरत्र करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. सध्या पाऊस-पाण्याचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी युद्धपातळीवर सुधारकार्य हाती घेत, ग्राहकांशी सौजन्यपुर्ण वागा, त्यांची अडचण समजून घ्या, वीजपुरवठा त्वरीत सुरळीत करण्यास काही अडचणी असतील तर त्याही ग्राहकांना समजावून सांगण्याच्या सुचनाही खंडाईत यांनी यावेळी केल्या. यावेळी मंडल निहाय मागणी, महसुल वसुली आणि थकबाकी यांचा सविस्तर आढावा घेतांनाच वसुली कार्यक्षमता कमी असलेल्या विभागांवर नाराजी व्यक्त करीत या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
उच्चदाब ग्राहकाचा नवीन वीजपुरवठ्यासाठी अर्ज येताच त्यास मागणीपत्र देतांना महावितरणच्या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करतांनाच ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळि केले. इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर बदली करताच त्याची नोंद महावितरणच्या प्रणालीमध्ये त्वरीत करून ती योग्य झाल्याची खातरजमा करा. ज्या कामासाठी आपण पगार घेतो, ते काम वेळीच पुर्ण करण्यासोबतच बिल दुरुस्तीचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या सुचनाही खंडाईत यांनी केल्या. ग्राहकाला योग्य बिल मिळावे यासाठी मीटरवाचनाच्या नोंदी योग्यरित्या तपासून घ्या, मीटरवाचकावर थातूरमातूर कारवाई करण्याएवजी त्याचे आधार कार्ड ब्लॉक करून संबंधित मीटरवाचन कंत्राटदाराची सेवा खंडित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
ग्राहकांकडील मीटर बदली करतांना वीजवापराचे युनिट योग्य आहे तेच समायोजित करा, अतिउच्चदाब आणि उच्चदाब ग्राहकांकडील मीटरवाचन पुर्णपणे स्वयंचलीत पद्धतीने होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देतांनाच आपल्या अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचा-यांना केवळ सुचना देवून न थांबता त्याचा वेळोवेळी आढावा धेण्याबाबतही त्यांनी यावेळी सांगितले. पैसे भरुनही प्रलंबित असणा-या वीजजोडण्या त्वरीत देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान
ग्राम स्वराज्य अभियानात नागपूर परिक्षेत्रात उल्लेखनिय काम केले असून विदर्भातील वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यात 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियानाचा विस्तारीत कार्यक्रम राबवायचा आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 281 गावांतील 5260 तर वाशिम जिल्ह्यातील 391 गावांतील 1423 घरकुलांना सौभाग्य योजनेतून वीज जोडण्या द्यायच्या आहेत. हे उद्दीष्ट विहीत कालावधीत पुर्ण करण्याच्या सुचनाही यावेळी सर्च संबंधितांना देण्यात आल्या.
या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता गुणवता नियंत्रण सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, प्रभारी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांचेसह व पाचही परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, लेखा व वित्त विभागातील अधिकारी उपस्थित होते.