राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखी भेट दिली आहे. पाटील यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्याकडे ६ दिवस मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार राहणार आहे.
१६ जूनपर्यंत मुख्यमंत्री पदावर
चंद्रकांत पाटील हे राज्य मंत्रिमंडळातील दोन नंबरचे मंत्री आहेत. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे ते सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील त्यांनी अनेक काळ घालविला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूलमंत्री पद असले तरी चंद्रकात पाटील मुख्यमंत्री होणार असे अनेकदा सांगण्यात येत असते. मात्र त्यांच्याकडे प्रभारी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दिल्याने ते आता सहा दिवस म्हणजेच १६ जूनपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर गेल्याने प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिवाय कृषीमंत्री पदाचा कार्यभार देखील त्यांच्याकडेच राहणार आहे. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर, चंद्रकात पाटील यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी चंद्रकात पाटील यांच्या कामकाजावर नेहमीच खूश असतात. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्री पाटील यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेक जणांनी भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश देखील केला आहे. कोल्हापुरातील राजकारणात यापूर्वी चंद्रकात पाटील यांना फारसे विचारात घेतले जात नव्हते. आता मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री पदच त्यांच्याकडे असल्याने जिल्ह्याच्या राजकारणार त्यांचे वजन आणखी वाढले आहे.