फोर्ब्सलाही आपल्या कृषी संशोधनाची दखल घ्यायला भाग पाडणारे एचएमटी तांदूळ तसेच इतर ८ वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी ३ जूनला निधन झाले. याच पार्श्वभूमिवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या बुधवारी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला येणार आहेत. याबाबतची माहिती कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी असलेले दादाजी यांनी भात पिकांवर अनेक नवे प्रयोग करून भाताचे नवनवे वाण विकसित केले . एचएमटी या प्रसिद्ध वाणाचे ते जनक होते. त्यांच्या या वाणाची लागवड करुन शेतकरी भरघोस पिक घेऊ लागले आहेत. तांदळाच्या बाजारात क्रांती घडविणाऱ्या या वाणाचे नाव विद्यापीठापासून जगात सर्वत्र पसरले आहे. दादांनी शोधलेले वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चोरले आणि स्वत:च्या नावावर खपवले; पण यामुळे दादा खचले नाहीत. नवनवीन वाण विकसित करण्याचे त्यांचे संशोधन सुरूच होते.
सरकारने त्याची कधी कदर केली नाही. त्यांना दिलेल्या एका पुरस्कातील सोन्याचे पदकही नकली होते. २०१० मध्ये फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव झळकले तेव्हा कुठे दादाजी संशोधक असल्याचा साक्षात्कार झाला. यावेळी राज्य सरकारने त्यांच्या गावात जाऊन त्यांचा गौरव केला. संशोधनासाठी २ एकर शेती दिली. यानंतर देशातल्या अनेक व्यासपीठांवर त्यांना निमंत्रित केले जाऊ लागले. याच कृषी संशोधकाचे ३ जूनला निधन झाले.