সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 05, 2018

स्वच्छता दर्पण रँकींगमध्ये चंद्रपूर देशात पहिले

26 जानेवारीपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा परिषदेने गेल्या 2 ऑक्टोंबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्हयात अवघे 176 कुटूंबांकडे शौचालय बाकी असून देशात हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या जिल्हयामध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. 26 जानेवारीपूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मागदर्शनात सुरु असलेल्या या प्रयत्नाला स्वच्छता दर्पण अनुक्रमाणिकेत भारतात पहिले स्थान मिळाले आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण अनुक्रमाणिक देण्यात आले आहे. त्यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणाऱ्या  चंद्रपूर जिल्हयाने पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्हयाला 69.11 टक्के गुण मिळाले.
केंद्र शासनाने केलेल्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुस-या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्हयाला पाचवा क्रमांक मिळाला आहे.महाराष्ट्रातील नाशिक 7, लातूर 9, अहमदनगर 10, उस्मानाबाद 16, औरंगाबाद 38, अकोला 42, परभणी 45, वाशिम 50, धुळे 55, हिंगोली 60, जळगाव 63, तर अमरावती जिल्हा 65 व्या क्रमांकावर आहे.

ग्रामीण भागातील गावे सुंदर व्हावी. गावात शाश्वत स्वच्छता कायम राहावी, यासाठी केंद्र व राज्‍य शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरु केले. राज्यात चंद्रपूर नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला 3 लाख 3 हजार 135 वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्हयातील संपूर्ण ग्राम पंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते.  त्यात जिल्हा परिषदेला आतापर्यंत 823 ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून लवकरच उर्वरित 4 ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.
येत्या जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त करण्याचा ध्यास घेतला गेला असून तशी वाटचाल सुरु केली आहे. या कामात चंद्रपूर जिल्हा परिषदेला 42.50 टक्के गुण प्राप्त झाले आहे. नादुरुस्त प्रसाधनगृहांचे काम करण्यात जिल्हा परिषद मागे पडली.

जिल्हयात 22 हजार नादुरुस्त प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी आतापर्यंत 6 हजार प्रसाधनगृहांचे काम करण्यात आले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.याशिवाय केलेल्या कामांचे चित्र ऑनलाईनमध्ये लोडिंग करावे लागतात. त्यातही जिल्हा परिषद मागे पडली आहे. या मूल्यांकनात ज्या कामांमध्ये कमी गुण मिळाले. त्या कामांची गती वाढवली जाईल. शिवाय कामे जलदगतीने करुन गावात शाश्वत स्वच्छता व त्या कामांची पारदर्शकता टिकविण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते यांनी दिली.


जनतेच्या सहकार्याने यश- जितेंद्र पापळकर
जिल्हयातील 14 तालुक्यातील 823 ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून, जिवती तालुक्यातील चार ग्राम पंचायती शिल्लक आहेत. त्या लवकरच गोदरीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. मूल्यांकनात ज्या त्रुटी आढळल्या त्या पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. जनतेच्या सहकार्यामुळेच चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल ठरला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
   

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.