नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन राणी लक्षमीनगर नागपूर येथील सायंटीफ़ीक सोसायटी सभागृह येथे सोमवार दि. 15 जानेवारी 2018 पासून करण्यात येत आहे.
या स्पर्धेउद्घाटन सोमवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी सकाळी 9 वाजता महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे आणि प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख, चंद्रपूर परिमंडळाचे परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर व मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. या स्पर्धेत सोमवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता अमरावती परिमंडलातर्फ़े प्रशांत शेंबेकर लिखित ‘काही सावल्यांचे खेळ’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल, दुपारी 2.30 वाजता जयंत पवार लिखित ‘अधांतर’ हा नाट्यप्रयोग चंद्रपूर परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल, तर सायंकाळी 7 वाजता चंद्रकांत शिंदे लिखित ‘एक क्षण आयुष्याचा’ हा नाट्यप्रयोग अकोला परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल. मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नागपूर परिमंडलातर्फ़े देवेंद्र वेलणकर लिखित ‘ते दोन दिवस’ हा नाट्यप्रयोग तर दुपारी 4 वाजता श्रीपाद जोशी लिखित ‘वादळ वेणा” चा नाट्यप्रयोग गोंदिया परिमंडलातर्फ़े सादर केला जाईल.
महावितरण कर्मचारी हा ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ग्राहक सेवेचे कर्तव्य अहोरात्र बजावत असतो, अश्यावेळी तो अनेकदा आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो, कर्मचारी सुदृढ असला की ग्राहकसेवा अधिक प्रभावी होईल याची जाणिव लक्षात घेता महावितरणने त्यांच्यासाठी या नाट्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभापुर्वी दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. प्रशांत जगताप आणि मानसोपचारतज्ञ डॉ. प्रवीण वराडकर यांचे ‘हृदयरोग आणि तणाव व्यवस्थपन’ या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजनही केले असून सोबतच विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्ताने वीज कर्मचारी आणि सामान्य वीज ग्राहकांचे प्रबोधन करणा-या ध्वनिचित्रफ़ीतीचे सादरीकरण यावेळी करण्यात येईल. त्यानंतर लगेच महावितरणचे संचालक (संचलन) अभिजीत देशपांडे यांच्या शुभहस्ते आणि जेष्ठ नाटककार व महाकवी सुधाकर गायधनी, प्रादेशिक संचालक भालचंद्र खंदाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान केली जातील.
या स्पर्धेत सादर करण्यात येणारे सर्व प्रयोग विनामुल्य असून नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धा आयोजकांकडून करण्यात आले आहे.