ब्रह्मपुरी वनविभागातील प्रस्तावित घोडाझरी जंगल हे आता नवे अभयारण्य म्हणून उदयास येणार आहे. राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा घोडाझरी हा महत्त्वाचा कॉरिडोर आहे. घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारे आहे. नागपूरपासून १०३ किमी अंतरावर घोडाझरी असून याबाबतचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून राज्य शासनाला गेला आहे. येत्या ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह ५४ अभयारण्य असून राज्यातील घोडाझरी हे ५५ वे अभयारण्य ठरणार आहे. १६० चौ. किमीचे ब्रह्मपुरी वनविभागातील नवे अभयारण्य अस्तित्वात येणार असल्याची शक्यता आहे. मागील वर्षी येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली. मात्र, त्यास हवा तसा खास प्रतिसाद मिळालेला नाही. आता मात्र, या अभयारण्याच्या रूपाने इको टुरिझमला बुस्टर मिळणार आहे.एकाच दिवशी होणाऱ्या जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्ष्यांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येईल,अशी माहिती सूत्राने दिली.
दोन गावांचे पुनर्वसन
या अभयारण्यात कोरंबी व घोडाझरी ही दोन गावे येतात. या दोन्ही गावांचे पुनर्वसन होणार असल्याची शक्यता आहे. तशा मौखिक सूचना वन विभागाकडून तेथील सरपंचांना दिल्या असून ठराव मागितले आहे. पर्यटकांना या अभयारण्यात हिरापूर येथील महापाषाणयुगीन मांडव गोटा व डोंगरगाव येथील खडक चित्रे यांचा समावेश केला जाणार आहे.